मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ४१६ जणांवर कारवाई; २०७ सहप्रवासीही दंडाला पात्र

ठाणे : करोना विषाणू संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर घरीच राहून नववर्षांचे स्वागत करण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून मद्याच्या नशेत रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या तळीरामांची ठाणे पोलिसांनी झिंग उतरवली. ठाण्यासह विविध शहरांत पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी, तपासणीमध्ये ४१६ चालक मद्यधुंदावस्थेत आढळले असून त्यांच्यासह प्रवास करणाऱ्या २०७ जणांवरही पोलिसांनी कारवाई केली. यातील सर्वाधिक कारवाई ठाणे शहरात करण्यात आली असून यात दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक आहे.

करोनाचे संकट कमी होत असताना ब्रिटनमधून उद्भवलेल्या करोनाच्या नव्या विषाणूने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये, याकरिता राज्य सरकारने सध्या रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. तसेच ३१ डिसेंबरच्या दिवशी होणाऱ्या पाटर्य़ामधून करोना पसरण्याचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनीही या कार्यक्रमांवर निर्बंध आणले होते. मात्र तरीही मद्यप्राशन करून वाहन चालवणे, संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणे, वाहतूक नियम मोडणे, असे प्रकार नागरिकांकडून झाले. अशा नागरिकांची झिंग पोलिसांनी उतरवली.

ठाणे पोलिसांनी गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत ४०६ मद्यपी चालकांवर कारवाई केली तर, शुक्रवारी पहाटे पाचपर्यंत २१७ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ३६१ दुचाकीस्वार, २९ तीनचाकी चालक, २६ चारचाकी चालकांचा समावेश आहे. मद्यधुंद चालकासोबत प्रवास करत असलेल्यांवरही पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, २५ ते ३० डिसेंबर या कालावधीत पोलिसांनी २१० मद्यपी चालक तसेच २०७ सहप्रवाशांवर कारवाई केली.

श्वासविश्लेषक यंत्राद्वारे मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यात ३१ डिसेंबरच्या रात्री ६२३ मद्यपींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. राज्यापेक्षा ठाण्यात सर्वाधिक कारवाई झाली आहे. 

– बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा.

विभागवार कारवाई

                              मद्यपी  सहप्रवासी

ठाणे                            १२४    ५२

भिवंडी                          ७७     ४४

कल्याण, डोंबिवली         ९८     ५४

विठ्ठलवाडी ते बदलापूर    ६२     २२