चौकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठाणे पोलिसांची ट्विटर मोहीम; जागृत ठाणेकरांकडून तक्रारीचा पाऊस

वाहतूक कोंडी, रिक्षाचालकांची मुजोरी, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, सोनसाखळी चोरीच्या घटना घडण्याचे प्रमाण प्रामुख्याने गर्दीच्या मुख्य चौकांमध्ये वाढते असते. शहरातील चौकांमधील गर्दीचा फायदा घेत अनेक बेकायदा गोष्टी करण्याचा प्रयत्न चौकांमध्ये केला जातो. शहरातील चौकांच्या समस्यांचे महत्त्व लक्षात घेऊन ठाणे पोलिसांच्या ट्विटर खात्यावरून ‘एक चौक एक समस्या’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे या माध्यमातून शहरातील चौकांच्या समस्यांची माहिती किंवा त्यावरील उपाय नागरिकांनी सुचवून पोलिसांपर्यंत पोहचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

‘ठाणे का हर एक चौक अब होगा चौकन्ना’ असे या मोहिमेचे घोषवाक्य असून प्रत्येक चौकातील समस्या मांडण्यासाठीचे ट्विटर व्यासपीठ पोलिसांच्यावतीने खुले करून देण्यात आले आहे.ठाणे शहरातील चौकाचौकांमध्ये होणाऱ्या घटनांकडे लक्ष देऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने ठाणे पोलिसांनी एक पाऊल उचलले आहे. ठाणे पोलिसांच्या ट्विटर खात्यावरून एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, प्रत्येक चौकातील समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. गुरुवारी सकाळी पोलिसांच्या ट्विटर खात्यावरून ही मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये नागरिकांनी प्रत्येक चौकातील समस्यांची जंत्री मांडण्यास सुरुवात केली आहे.

प्रत्येक चौकात समस्या निर्माण होत असतात. त्या सोडवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन उपाय सुचवण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ठाणे पोलिसांच्या ट्विटर  या वर ट्वीट करता येऊ शकणार आहे.