फरारी आरोपीला अटक; अपहृत मुलाचा मृत्यू
ठाणे येथील हाजुरी परिसरातून एका दहा वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या कादीर एैश महम्मद चौधरी (५०) याला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटने शिताफीने अटक केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर उत्तरप्रदेशातून जेरबंद केले. तसेच अपहृत मुलाचा दहा वर्षांपूर्वीच ट्रक अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पोलिसांनी या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा पोलीस शोध घेत आहेत.
ठाणे येथील हाजुरी परिसरात प्रमोद राममूर्ती गौतम (१६) राहायचा. दहा वर्षांपूर्वी त्याचे अपहरण झाले होते. या गुन्ह्य़ाच्या तपासादरम्यान पोलिसांनी त्या वेळी अब्दुल शमी एैश महम्मद चौधरी, महम्मद हमील ऊर्फ लड्डू अब्बास खान आणि जलालउद्दीन जुम्मन खान या तिघांना अटक केली होती. या तिघांच्या अटकेनंतरही प्रमोदचा शोध लागला नव्हता. तसेच कादीर चौधरी हा फरार होता आणि गेल्या दहा वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. गेल्या काही महिन्यांपासून ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने विविध गुन्ह्य़ांतील फरारी आरोपींचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्या मोहिमेंतर्गत पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त नागेश लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे आणि पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या पथकाने कादीरला शोधून अटक केली.
ठाणे ते नाशिक प्रवासादरम्यान भिवंडीमधील दिवागाव परिसरात ट्रकमधून खाली पडल्याने प्रमोदचा मृत्यू झाल्याची माहिती त्याने पोलिसांना चौकशीदरम्यान दिली आहे. यामुळे वागळे युनिटच्या पथकाने नारपोली पोलीस ठाण्यातील दहा वर्षांपूर्वीच्या अपघाताच्या नोंदी तपासल्या असून त्यामध्ये प्रमोदच्या फोटोवरून त्याच्या अपघाताची नोंद सापडली आहे. या मृत्यूबाबत पोलिसांना संशय असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू केला असून त्यासाठी शवविच्छेदन अहवालाच्या आधारे प्रमोदच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.