News Flash

ठाण्याच्या नाक्यावर रिक्षांची गुंडगिरी

मुंबई महानगर प्रदेशात रिक्षांच्या मुक्त प्रवासाला राज्य सरकारने यापूर्वीच परवानगी दिली आहे.

मुलुंड येथील मॉडेला नाका येथे अडवून दमबाजी करण्याचे प्रकार सध्या वाढीस लागले आहेत.

मुंबईहून येणाऱ्या रिक्षाचालकांना दमबाजी; मनमानी भाडे आकारणी
मुंबई महानगर प्रदेशात रिक्षांच्या वाहतुकीला सीमेचे बंधन नसावे, असा स्पष्ट आदेश राज्य सरकारने देऊनही ठाण्याच्या वेशीवर मात्र रिक्षाचालकांच्या गुंडगिरीच्या प्रतापांमुळे प्रवाशी अक्षरश: हैराण झाले आहेत. मुंबई तसेच नवी मुंबईतून ठाण्याच्या दिशेने प्रवाशांना घेऊन येणाऱ्या रिक्षाचालकांना पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर चेकनाका तसेच मुलुंड येथील मॉडेला नाका येथे अडवून दमबाजी करण्याचे प्रकार सध्या वाढीस लागले आहेत. त्यामुळे ठाण्याचे भाडे नाकारण्याकडे मुंबई, नवी मुंबईतील रिक्षाचालकांचा कल वाढू लागला आहे. विशेष म्हणजे, वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत ही दमबाजी होत असताना पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
मुंबई महानगर प्रदेशात रिक्षांच्या मुक्त प्रवासाला राज्य सरकारने यापूर्वीच परवानगी दिली आहे. ठाण्यातून मुंबईतील कोणत्याही भागात जाण्यासाठी रिक्षातून प्रवास सुरू केल्यानंतर चेकनाका परिसरात उभे असणारे रिक्षाचालकांचे गट या रिक्षांना चेकनाक्यावर थांबवतात. प्रवाशांना रिक्षातून खाली उतरायला लावून दुसऱ्या रिक्षातून प्रवास करण्यास भाग पाडतात. याला विरोध करणाऱ्या प्रवाशांना या रिक्षाचालकांच्या टोळीचा सामना करावा लागत आहे. मध्यंतरी वाहतूक विभागाने अशा मुजोर रिक्षाचालकांच्या मुसक्या आवळल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा ठाण्याच्या वेशीवर रिक्षाचालकांच्या ठरावीक गटाची दादागिरी सुरू झाली आहे. मुंबई, नवी मुंबईतून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकांनी या अडवणुकीस विरोध केला, तर रिक्षाची तोडफोड करण्यापर्यंत या गुंडांची मजल गेली आहे. मॉडेला चेक नाक्यावरून ठाणे आणि मुलुंड भागात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची रोजची संख्या सुमारे दीड लाखाहून अधिक आहे. ठाण्याहून मुलुंड हद्दीत गेल्यावर रिक्षा थांबा अर्धा किलोमीटर इतका लांब असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. प्रवाशांकडे जर सामान असेल तर त्यांच्या त्रासात अधिकची भर पडते. कोपरीकडील आनंदनगर टोलनाक्याच्या परिसरामध्ये हा प्रकार सर्रास पाहायला मिळत आहेत.
रिक्षाचालक आणि संघटनांची आडमुठी भूमिका..
मुंबईतल्या रिक्षा ठाण्यात आणि ठाण्यातल्या रिक्षांना मुंबईत कोणत्याही र्निबधाशिवाय वाहतूक करता यावी ही ३३ वर्षे जुनी मागणी आहे. विजू नाटेकर रिक्षा-टॅक्सी युनियनने ही मागणी १९८२ साली प्रथम केली होती. त्यानंतर या विषयाचा सतत पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे राज्य शासनाने त्यास मान्यता दिली होती. तेव्हापासून रिक्षा एकमेकांच्या हद्दीत जाऊ-येऊ लागल्या; पण काही रिक्षा संघटनांच्या आडमुठेपणामुळे त्याला पूर्णत: यश येऊ शकले नाही.
ठाणे जिल्हातून मुंबईत प्रवेश करण्यासाठी दहिसर चेक नाका, श्रीनगर, वागळे इस्टेट, मुलुंड महामार्गावरून ऐरोली पूल, चेंबूर नाका, मॉडेला चेक नाका आणि आनंद नगर चेक नाका असे एकूण सहा मार्ग आहेत. सर्व ठिकाणी परिस्थिती जवळपास सारखीच आहे.

मुंबई-ठाणे दोन्ही शहरांमध्ये रिक्षांना मुक्त प्रवास आहे. त्यामुळे प्रवाशांनी रिक्षाने थेट प्रवास करावा. याबद्दल कोणी दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असल्यास प्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार करावी. अशा प्रकारची दहशत पसरवून कायदा मोडू पाहाणाऱ्या रिक्षाचालकांना दोन हजार रुपये इतका दंड तसेच ३० दिवस परवाना रद्द करण्याची कायद्यात तरतूद आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या १८००२२५३३५ या हेल्पलाइन क्रमांकावर प्रवाशांनी तक्रारी कराव्यात. तसेच mh04@mahatranscom.in या ई-मेलवर तक्रारी कराव्यात.
– संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,
प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2016 3:00 am

Web Title: thane rickshaw driver fighting with mumbai rickshaw drivers
टॅग : Rickshaw Drivers
Next Stories
1 प्रवाशांवर रेल्वेची ‘धूळफेक’
2 कल्याण-डोंबिवलीतील तरणतलावांना सुट्टी नाहीच!
3 टीएमटीच्या चालकांची नियमित ‘मद्य’ तपासणी करा
Just Now!
X