वसई : वसईत बुधवारी दोन नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण करोनाग्रस्तांची संख्या आता ५३ झाली आहे. यामध्ये विरारमधील एक महिला आणि वसईतील एका पुरुषाचा समावेश आहे. मीरा-भाईंदरमध्ये मात्र एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.

विरारच्या जुन्या महाविद्यालयाजवळील परिसरात राहाणाऱ्या ३८ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली. तिच्या पतीला यापूर्वीच करोनाची लागण झालेली होती, तर वसईच्या गोखिवरे येथील ३५ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे उघड झाले. तो काही दिवसांपूर्वी कुर्ला येथून आला होता. त्यांच्या कुटुंबीयांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामुळे वसई-विरारमधील एकूण करोनाग्रस्तांचा आकडा आता ५३ झाला आहे. यातील पाच रुग्ण दगावले असून केवळ १ रुग्ण बरा झालेला आहे. आतापर्यंत लागण झालेले बहुताशं रुग्ण हे कोरनाबाधितांच्या संपर्कातील असल्याचे पालिकेने सांगितले. त्यामुळे समाजात करोनाची लागण झालेले नसल्याने नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मीरा-भाईंदरमध्ये ३७३ जणांना घरी सोडले

मीरा-भाईंदर शहरात एकही नवा करोनाबाधित रुग्ण आढळून न आल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील संख्या ४९ झाली आहे. यापैकी दोन रुग्णाचा मृत्यू झाला असून दोन रुग्णांना करोनामुक्त करण्यात आले आहे. मीरा-भाईंदरमध्ये आतापर्यंत १,०७१नागरिकांना तपासणीसाठी शोधण्यात आले आहे. यापैकी ६८९ नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, तर ३७३ नागरिकांना १४ दिवसांच्या तपासणीनंतर घरी सोडण्यात आले आहे. त्याच प्रकारे ४८४ नागरिकांना घरातच अलगीकरण करण्यात आले आहे. एकूण १२६ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून अहवाल प्रतीक्षेत आहे.