सुमारे दीड महिन्यांपूर्वी काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या युवकाच्या हत्येप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हत्या झालेल्या युवकाकडील सोन्याचे दागिने मिळविण्यासाठी आरोपींनी त्याची हत्या केली होती.

२३ नोव्हेंबरला काशीमीरा पोलिसांना घोडबंदर परिसरात महामार्गालगत झुडपांमध्ये एका अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला होता. समाजमाध्यमांमध्ये तसेच आसपासच्या सर्व पोलीस ठाण्यांना युवकाचे छायाचित्र पाठविल्यानंतर हा मृतदेह मुंबईतील गिरगावात राहणाऱ्या शिवशंकर ऊर्फ निक्कू चौरसीया याचा असल्याचे स्पष्ट झाले. निक्कू आणि त्याच्या वडिलांचे वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर पानाचे दुकान होते. निक्कू सकाळी न्याहारी करण्यासाठी जातो, असे वडिलांना सांगून दुकानातून गेला तो परत आलाच नव्हता.

पोलिसांनी रेल्वे स्थानकासह आसपासच्या सर्व सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता निक्कू तीन जणांसोबत जात असल्याचे दिसून आले, परंतु या तिघांनाही निक्कूच्या घरचे कोणीही ओळखत नव्हते. मुंबई तसेच मीरा रोड परिसरात तबब्ल ४०० जणांची तपासणी केल्यानंतरही कोणताही दुवा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर दीड महिन्यानंतर खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार निक्कूसोबत असलेले तीन जण हे कमलेश साहनी, रुपेश साह आणि मंटू पटेल असल्याचे समजले. आरोपी राहत असलेल्या ठिकाणाची माहिती घेऊन पोलिसांनी प्रथम नालासोपारा येथून कमलेश साहनी याच्या मुसक्या आवळल्या. त्याने हत्येनंतर रुपेश व मंटू बिहारला पळून गेल्याचे पोलिसांना सांगितले.

साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी लगेचच पोलिसांचे पथक बिहारला रवाना केले. वेश बदलून आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी रुपेश आणि मंटू या दोघांनाही बेडय़ा घातल्या.