पश्चिम बंगालमधील महिला व तिच्या पतीला नोकरीचे आमिष दाखवून डोंबिवलीत आणत उपजीविकेसाठी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी तीन जणांना कल्याण जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. गोगरकर यांनी ‘पिटा’ कायद्याने शिक्षा सुनावली. एका आरोपीला सात वर्षे तर, दोन आरोपींना दोन वर्षांची कैद सुनावली आहे.
या प्रकरणात सरकारी वकील शंकर रामटेके यांनी ११ साक्षीदार तपासले. दोन वर्षांपूर्वी राजू शेख याने पश्चिम बंगालमधील आपल्या मित्राला संपर्क करून मुंबईत नोकरी लावतो असे सांगून बोलावून घेतले. मित्र व त्याची पत्नी कल्याण येथे आले. राजू व त्याच्या साथीदारांनी महिलेच्याोतीला गावी जाण्यास सांगितले. त्यानंतर राजूने पीडित महिलेला डोंबिवलीतील आर्या, ड्रिमलॅन्ड लॉजमध्ये ठेवले. या महिलेवर राजू व त्याच्या साथीदारांकडून बलात्कार करण्यात आला. उपजीविकेसाठी तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. या प्रकरणात लॉजचा मालक प्रदीप मोहंती, प्रकाश यादव यांनीही सहभाग घेतला.
पीडित महिलेने हा सगळा प्रकार पतीला कळविला. पतीने महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले. आरोपींविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून हा खटला कल्याण न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील शंकर रामटेके यांनी खंबीरपणे बाजू मांडल्याने आरोपींना पिटा कायद्याने न्यायालयाने शिक्षा सुनावली. या प्रकरणातील दोन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.