ठाणे महापालिका क्षेत्रात उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारतींच्या शेवटच्या मजल्यापर्यंत आग विझविण्याकरिता ठाणे अग्निशमन दलाकडे पुरेशी यंत्रणाच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सत्ताधारी शिवसेनेने ६५ मीटर किंवा त्यापेक्षा उंच शिडीची गाडी घेण्याचा प्रस्ताव आणला असून त्यास मंजूरी देण्याकरिता येत्या २० मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे या प्रस्तावाची सुचना मांडली आहे.
काळबादेवी येथील गोकुळ इमारतीत लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील उंच इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही वर्षांत ठाणे, घोडबंदर, कळवा तसेच मुंब्रा भागात टोलेजंग इमारती उभ्या राहील्या आहेत.
महापालिकेच्या शहर विकास विभागामार्फत अधिकृत परवानग्या घेऊन या इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र, या इमारतींमध्ये भविष्यात एखाद्या आगीची घटना घडली तर ती विझविण्याकरिता अग्निशमन दलाकडे पुरेशी यंत्रणा नाही. असे असतानाही या इमारती उभारणीकरिता महापालिकेने परवानग्या देऊ केल्या आहेत. सध्यास्थितीत ठाणे अग्निशमन दलाच्या ताफ्यात ५५ मीटर उंचीची शिडी असणारे वाहन आहे. मात्र, शहरातील उंचीचे प्रमाण पहाता, त्या तुलनेत ही शिडी पुरेशी नसून त्यासाठी सुमारे ६५ मीटर किंवा त्यापेक्षा उंच शिडी गरजेची आहे. ही वस्तूस्थिती पुढे येताच स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांनी येत्या सर्वसाधारण सभेत ६५ मीटर किंवा त्यापेक्षा उंच शिडीची गाडी घेण्याच्या प्रस्तावाची सूचना मांडली आहे.
स्वतंत्र नियंत्रण कक्ष
ठाणे शहराचा वाढता विस्तार व आधुनिकीकरण लक्षात घेता आपतकालीन परिस्थितीस समोरे जाण्यासाठी अग्निशमन दलाकडे स्वतंत्र नियंत्रण कक्ष नाही. त्यामुळे अग्निशमन दलाकडे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण पाहून आपतकालीन परिस्थिती सहजरित्या आणि सुलभरित्या हाताळण्याकरिता स्वतंत्र नियंत्रण कक्षाची गरज आहे. त्यामुळे स्वतंत्र नियंत्रण कक्षाचाही समावेश या प्रस्तावाच्या  सुचनेत करण्यात आला आहे.