इंटरनेट बंद पडल्यानंतरही सेवांचे कामकाज सुरूच

ठाणे महापालिकेच्या कार्यालयांतील इंटरनेट बंद पडल्याने विविध कामांकरिता येणाऱ्या नागरिकांना तिष्ठत रहावे लागण्याचे प्रकार आता बंद होणार आहेत. ठाणे महापालिका मुख्यालय तसेच प्रभाग समिती कार्यालयांना जोडणाऱ्या इंटरनेट केबल वाहिन्या विविध रस्ते खोदाईच्या कामांमुळे तुटत असल्याने त्याचा परिणाम कार्यालयांमधील इंटरनेट सेवेवर होतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता ‘मल्टीप्रोटोकोल लेबल स्विचिंग’ या  अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोडणी घेण्याचा प्रस्ताव तयार केला असून या तंत्रज्ञानामध्ये इंटरनेटच्या केबल वाहिन्या मेस टोपोलॉजी (जाळी पद्घतीने) जोडण्यात येतात. त्यामुळे एखादी वाहिनी तुटली तरी त्याचा कार्यालयातील इंटरनेट सेवेवर परिणाम होणार नाही. तसेच मालमत्ता तसेच विविध करांचा भारणा करण्यासाठी आलेल्या नागरिकांचीही इंटरनेट सेवेअभावी होणारी गैरसोय टळणार आहे.

ठाणे महापालिका मुख्यालय आणि सर्वच प्रभाग समिती कार्यालये इंटरनेटच्या साहाय्याने जोडण्यात आली असून त्यासाठी ‘स्टार टोपोलॉजी’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामध्ये मुख्यालय, डेटा सेंटर आणि प्रभाग समिती कार्यालये एका केंद्रबिंदूपासून ते दुसऱ्या केंद्रबिंदूपर्यंत अशी जोडण्यात आली आहेत. एमटीएनएलमार्फत सहा वर्षांपूर्वी या तंत्रज्ञानाची जोडणी करण्यात आली होती. मात्र, या तंत्रज्ञानामध्ये एखादी इंटरनेटची केबल वाहिनी तुटली तर कार्यालयातील इंटरनेट सेवा ठप्प होते. त्याचा फटका कार्यालयामध्ये मालमत्ता कर तसेच विविध कराचा भरणा करण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसतो.

या नागरिकांना इंटरनेट सुविधा सुरू होईपर्यंत तासन्तास रांगेत उभे रहावे लागते. गेल्या काही वर्षांत असे प्रकार अनेकदा घडले आहेत. याशिवाय कार्यालयातील अन्य कामांचाही खोळंबा होतो.  या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता एमटीएनएलमार्फत पुरविण्यात येणाऱ्या ‘मल्टी प्रोटोकॉल लेबल स्विचिंग’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोडणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून तो येत्या सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. यापूर्वीच्या इंटरनेट सेवेमध्ये मुख्यालय तसेच प्रभाग समिती कार्यालयामध्ये २ एमबीपीएस इतका इंटरनेटचा वेग होता. मात्र नव्या सेवेमध्ये आता १० एमबीपीएस इतका इंटरनेटचा वेग असणार आहे. त्यामुळे कार्यालयामधील कामे अधिक जलदगतीने करणे शक्य होणार आहे.

यंत्रणा काय?

स्टार टोपोलॉजी या तंत्रज्ञानामध्ये इंटरनेटच्या केबल वाहिन्या मुख्यालय, डेटा सेंटर आणि प्रभाग समिती कार्यालये अशा जोडण्यात आलेल्या असतात. त्यापैकी एखादी वाहिनी तुटली तर संबंधित कार्यालयाची इंटरनेट सेवा ठप्प होते. मात्र, मल्टिप्रोटोकोल लेबल स्विचिंग या तंत्रज्ञानामध्ये ‘मेस टोपोलॉजी’चा म्हणजेच जाळी पद्घतीचा वापर करण्यात येतो. त्यामध्ये एकपेक्षा अधिक इंटरनेट केबल वाहिन्यांनी पालिकेची कार्यालये जोडण्यात आलेली असतात. त्यामुळे एखादी केबल तुटली तरी कार्यालयांमधील इंटरनेट सेवा दुसऱ्या वाहिनीवरून सुरळीतपणे सुरू राहते.