ठाणे-कळवा तसेच मुंब्रा भागात पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना गेल्या काही वर्षांपासून घडत असल्याने महापालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी विशेष खबरदारी घेऊ लागली आहे. यंदाही महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतीची माहिती घेण्यास सुरुवात केली असून त्याआधारे अशा इमारतींची सविस्तर यादी तयार करण्यात येत आहे. येत्या १० मेपर्यंत ही यादी जाहीर करण्याच्या हालचाली सुरू असून त्यानंतरच या इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
गेल्या काही वर्षांत ठाणे, कळवा तसेच मुंब्रा परिसरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहेत. शीळ-डायघर येथील लकी कंपाऊंडमधील सात मजली इमारत दुर्घटनेनंतर अनेक अनधिकृत इमारती कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे अनधिकृत इमारतींच्या बांधकाम दर्जाविषयी अनेक प्रश्नचिन्हे निर्माण होऊ लागली होती.
या पाश्र्वभूमीवर महापालिकेने अधिकृत तसेच अनधिकृत इमारतीचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी काही खासगी संस्थांच्या पॅनलची निवड करण्यात आली. मात्र, अनेक इमारतधारकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
महापालिकेचे अधिकारी इमारतींची पाहणी करून अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींची यादी तयार करतात. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बांधकामाविषयी कोणतेही तांत्रिक ज्ञान नसतानाही त्यांच्याकडून अशी यादी तयार करण्यात येत असल्याची टीका लोकप्रतिनिधींकडून वारंवार होत आहे. असे असतानाच यंदाही महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींची माहिती घेऊन सविस्तर यादीची सुरुवात केली आहे.
येत्या १० मेपर्यंत ही यादी जाहीर करण्यात येणार असून त्यानंतरच या इमारती जमीनदोस्त करण्याची
कारवाई आणि त्यातील रहिवाशांचे पुनर्वसनाचे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रभारी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.

महापालिकेकडील प्राथमिक माहितीनुसार मुंब्रा भागात २६ तर कळवा भागात सात अतिधोकादायक इमारती आहेत, त्या तुलनेत अन्य भागांत अशा इमारतींचे प्रमाण कमी आहे. येत्या १० मेपर्यंत अशा इमारतींची यादी जाहीर करण्यात येईल.
– सुनील चव्हाण,महापालिकेचे प्रभारी आयुक्त