पुरेशा देखभाल दुरुस्तीअभावी गेल्या अनेक वर्षांपासून काहीसे दुर्लक्षित झालेले मानपाडा परिसरातील मुल्लाबाग येथील निसर्ग उद्यान पुन्हा कात टाकणार आहे. पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय ठरू शकेल अशा या उद्यानाच्या दिशेने जाणारा अतिशय अरुंद असा आहे. त्यामुळे या उद्यानात येजा करताना रहिवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असे. हे लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने या उद्यानाकडे जाणारा रस्ता ३० मीटपर्यंत रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
घोडबंदर परिसरातील मानपाडा येथील मुल्लाबाग येथे सुमारे ११ एकर परिसरात निसर्ग उद्यान आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेले हे उद्यान पर्यटन तसेच निसर्गप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरले आहे. या भागातील रहिवाशांची मागणी लक्षात घेऊन महापालिकेने काही वर्षांपुर्वी या उद्यानात लक्षावधी रुपयांचा खर्च करून जॉगिंग ट्रॅक उभारला. याशिवाय अ‍ॅम्पी थिएटरसारख्या सुविधाही या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या. अधिकाधिक रहिवाशांनी या उद्यानाचा वापर करावा असा हेतू यामागे होता. आजही सकाळ, सायंकाळी या उद्यानात फेरफटका मारावयास येणाऱ्या नागरिकांची संख्या बरीच मोठी आहे. मात्र, या निसर्ग उद्यानाकडे जाणारा रस्ता अतिशय अरुंद असल्याने अधिकाधिक रहिवाशांना इच्छा असूनही या उद्यानाचा वापर करता येत नाही. या रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी मागणी या भागातील रहिवाशांनी लावून धरली होती.
पालकमंत्री एकनाथ िशदे यांनीही मध्यंतरी या उद्यानाच्या अधिकाधिक वापरासाठी उपाय आखण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहर विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद निंबाळकर यांच्यासह या परिसराला भेट दिली. या वेळी उद्यानाच्या दिशेने जाणारा रस्ता तब्बल ३० मीटर रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या अर्थसंकल्पात या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक तरतूद केली जाईल, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. तसेच घोडबंदर तसेच आसपासच्या परिसरातील रहिवाशांना सोयीच्या ठरतील, अशा सुविधाही या उद्यानात उभारल्या जातील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.