ठाणे : रस्ते बांधणी हमी कालावधीची मुदत शिल्लक असतानाही संबंधित ठेकेदारांकडून त्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत, तर त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेचे नगर अभियंता अनिल पाटील यांनी बुधवारी स्थायी समितीत दिली.

पावसामुळे डांबर किंवा अन्य साहित्य वापरून खड्डे बुजविणे शक्य होत नसले तरी तात्पुरता पर्याय म्हणून पेव्हर ब्लॉक आणि बांधकाम साहित्य वापरून खड्डे बुजविण्यात येत आहेत. तसेच पाऊस थांबल्यानंतर डांबर किंवा अन्य साहित्य वापरून खड्डे भरण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी गेल्या आठवडय़ात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना रस्त्यावर उतरावे लागले होते. त्यापाठोपाठ महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी सर्व यंत्रणा रस्त्यावर उतरवून शहरातील खड्डे बुजविण्याची कामे केली. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील खड्डय़ांचा मुद्दा गाजला.

पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडू नयेत म्हणून महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. रस्त्यांची कामे करायची आणि पुन्हा त्याच रस्त्यावरील खड्डे बुजवायचे, असे प्रकार घडत असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी केला. ठाणे शहरात कोटय़वधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर खड्डे पडले असून या ठेकेदारांवर प्रशासन काय कारवाई करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नेमका हाच धागा पकडून राष्ट्रवादीचे सिराज डोंगरे, शानू पठाण आणि शिवसेनेचे नगरसेवक शैलेश पाटील यांनी मुंब्रा आणि दिवा परिसरातील रस्त्यांची व्यथा मांडली.

यावर उत्तर देताना शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर खड्डे नसल्याचा दावा नगर अभियंता अनिल पाटील यांनी केला. ‘विविध वाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे डांबरी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हे सर्व खड्डे भरण्याची कामे सुरू आहेत. रस्ते बांधणी हमी कालावधीची मुदत शिल्लक असेल तर संबंधित ठेकेदारांकडून खड्डे बुजविण्यात येतील. त्यासाठी महापालिका पैसे खर्च करणार नाही. या ठेकेदारांनी खड्डे बुजविले नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील,’ असेही त्यांनी सांगितले.

ही तर शोकांतिका..

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांना स्वत: रस्त्यावर उतरावे लागते, ही शोकांतिका असल्याचे सांगत भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी सत्ताधारी शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. प्रशासनाला रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्यामुळेच या दोघांना रस्त्यावर उतरावे लागले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.