News Flash

ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत १०० फूट उंच चिमणी

२० ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश

ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत १०० फूट उंच चिमणी

२० ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश; नागरिकांची धूर आणि दुर्गंधीतून सुटका होणार

ठाणे : येथील खारटन रोड तसेच आसपासच्या परिसरांतील नागरिक जवाहरबाग स्मशानभूमीतून निघणाऱ्या धूर आणि दुर्गंधीमुळे गेल्या काही महिन्यांपासून हैराण झाले असून या नागरिकांच्या व्यथा ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये सातत्याने मांडल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी जवाहरबाग स्मशानभूमीची नुकतीच पाहाणी केली असून येत्या २० ऑगस्टपर्यंत शंभर फूट उंचीच्या चिमणीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे नागरिकांची धुरातून आणि दुर्गंधीतून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीचे काही महिन्यांपूर्वीच नूतनीकरण करण्यात आले होते. या कामादरम्यान स्मशानभूमीतील धुरासाठी ४० फूट उंचीची चिमणी बसविण्यात आली होती. मात्र, या चिमणीतून निघणारा धूर आसपासच्या परिसरांत पसरून दुर्गंधी येत होती. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी करोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जात असून यामुळे या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त मृतदेह येत आहेत. त्यामुळे चिमणीतून निघणाऱ्या धुराचे आणि दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. अनेक नागरिकांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच नागरिकांच्या व्यथा ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये सातत्याने मांडल्या जात होत्या. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शुक्रवारी जवाहरबाग स्मशानभूमीची पाहाणी केली. त्या वेळेस त्यांनी सद्य:स्थितीत असलेली चिमणी काढून त्या जागी शंभर फूट उंचीची चिमणी २० ऑगस्टपर्यंत बसविण्याचे आदेश दिले आहेत. या वेळी त्यांनी याच भागातील मुख्य भाजीमंडईची पाहणी केली.

या ठिकाणी कचरा होऊ नये यासाठी दिवसातून किमान दोनदा कचरा उचलण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानंतर त्यांनी दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथील मैदानाची पाहाणी केली.

ठाणे महापालिका प्रशासनाने जवाहरबाग स्मशानभूमीच्या चिमणीची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यामध्ये धूर रोखणारी यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. अशा प्रकारची कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास स्थानिकांची या धुराच्या त्रासातून सुटका होईल.

– जगदीश खैरलिया, विश्वस्त, समता विचार प्रचारक संस्था

गेल्या काही दिवसांपासून जवाहरबाग स्मशानभूमीतून मोठय़ा प्रमाणात अंत्यसंस्कार केले जात असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धूर आणि दुर्गंधीचे प्रमाण वाढले असून या समस्येमुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. मात्र, पालिका प्रशासनातर्फे नवी चिमणी बसविण्यात येत असल्यामुळे आम्हाला काही प्रमाणात दिलासा मिळेल.

– मयूर खरात, स्थानिक रहिवासी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 1:49 am

Web Title: tmc to raise height of chimney in jawahar baug crematorium zws 70
Next Stories
1 ठाण्यात महिनाभरात शंभरपेक्षा अधिक वृक्ष भुईसपाट
2 ठाण्यात सम-विषमऐवजी सर्वच दुकाने सुरू करा
3 गरीब करोना रुग्णांना मोफत औषधे
Just Now!
X