नाल्यातील गाळांवर ‘त्रिभुज प्रदेश’ झाल्याच्या लेखी आणि सचित्र तक्रारी देऊनही पालिका आणि प्रभाग समितीतील कर्मचाऱ्यांच्या ‘निर्लज्ज’ कामचुकारपणाचा शिरस्ता कायम राहिलेला आहे. ‘आज काम करतो’, ‘उद्या सफाई होईल’ अशा उत्तरांनी तक्रारदारांची बोळवण केली जात असून, गेल्या दोन महिन्यांपासून कणभरही काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे नाल्यातील त्रिभुज प्रदेशांवर उगवलेली झाडे वाढत आहेत. त्याचबरोबर गाळामुळे तयार झालेल्या आयत्या जमिनीवर उथळसर येथील झोपडय़ांमधून वराहपालनाचा उद्योग सुरू झाला आहे, त्याबाबतही अधिकारी कारवाई करण्याऐवजी ढिम्म बसून आहेत.
पालिका आणि प्रभाग समितीच्या ‘मंदोत्तम’ कारभारामुळे संबंधित परिसरातील सोसायटय़ांमधील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जर तक्रार देऊन पालिका किंवा प्रभाग समितीतील कर्मचारी आश्वासनेच देत असतील, तर कुणाकडे तक्रार करावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
या संदर्भात, महापालिकेच्या उथळसर प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त डॉ. सागर घोलप यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणी तात्काळ माहिती घेऊन लगेच कारवाई करतो, असे सांगितले.

उत्तरे आणि प्रश्न
प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांनी तक्रारीवर अंमलबजावणीसाठी शेरा दिला असतानाही, संबंधित अधिकारी पगारे यांच्याकडून ‘वार्षिक नालेसफाईत’ हे काम होईल. ‘त्यासाठी पालिकेकडे पैसे नाहीत’, ‘हे काम कठीण आहे’, तरीही उद्या काहीतरी करून सफाई करतो, अशी उत्तरे आली. जर पालिकेकडे या कामांसाठी पैसे नसतील, तर नागरिकांकडून उकळल्या जाणाऱ्या करांतून नालेसफाईसाठी खर्च होणाऱ्या कोटय़वधी रुपयांचे होते काय, असा प्रश्न या परिसरातील नागरिक विचारीत आहेत. वार्षिक नालेसफाई ही मेअखेपर्यंत केली जात नाही. सप्टेंबर महिन्यात नवा गाळ तयार होण्याइतकी ती सफाई वाईट असल्याने, मेअखेपर्यंत वराहपालन आणि गाळामुळे होऊ शकणाऱ्या आजारांची जबाबदारी पालिका घेणार आहे का, असा सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित होत आहे. स्वाइन फ्लूचे संकट देशभर असताना, पालिका कारवाईबाबत डोळेझाक का करीत आहे, याचे उत्तर येथील नागरिकांना हवे आहे.

गाळ, तक्रारी आणि उदास अधिकारी!
संपूर्ण ठाणे शहरामधील नाल्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गाळाचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी गाळांनी नाल्याचा प्रवाह रोखला आहे, तर काही ठिकाणी पालिकेने भुयारी गटारांचे काम सोडून दिल्याने उरलेल्या रेती, दगडांचा नवा थर तयार झाला आहे. विविध भागांतून तक्रारी देणारे नागरिक कोणतीही कारवाई होत नसल्याने हतबल झाले आहेत. उथळसर प्रभाग समितीच्या हद्दीत येणाऱ्या नाल्यावर गाळ आणि बांधकामसाहित्य यांचा एकत्रित डोंगरच तयार झाला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रारी देऊनही प्रभाग अधिकारी केवळ तोंडी फर्मान काढण्यापलीकडे काहीच करीत नाही, असे भागीरथी-जगन्नाथ सोसायटीचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी सांगितले. या गाळामुळे डेंग्यू व इतर आजारांचा फैलाव होऊ शकतो, त्यातच आयत्या गाळावर जवळील झोपडपट्टय़ांमधून वराहपालनाचा नवा उद्योग सुरू झाला आहे. त्याचीही तक्रार देण्यात आली आहे, मात्र ‘उद्या सकाळी सर्व काम होईल’, ‘आज संध्याकाळपर्यंत सारी सफाई होईल’, अशा उत्तरांपलीकडे काहीच ऐकायला मिळत नाही, असे चव्हाण म्हणाले.