जुन्या प्रकल्पांनाच बळ मिळण्याची शक्यता

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : ठाणे महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प उद्या, शुक्रवारी सादर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ३७८० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. मात्र, यंदा करोना संकटामुळे महापालिकेच्या जमा-खर्चाचे गणित बिघडले असून या तुटीमुळे यंदाचा अर्थसंकल्प २८०० कोटींचा तयार करण्यात आला आहे. जवळपास नऊशे कोटींनी अर्थसंकल्प कमी झाल्याने त्यात नव्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आलेला नसून सद्य:स्थिती असलेले जुनेच प्रकल्प मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये होणार आहेत. या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर यंदाच्या वर्षांचा अर्थसंकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, गेल्या वर्षी करोना संकटामुळे महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळू शकलेले नाही. त्यातच करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे महापालिकेच्या खर्चात वाढ झाली आहे. या जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने महापालिकेपुढे मोठे आर्थिक आव्हान आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीचा असलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. प्रशासन आता जमा-खर्चाचे ताळमेळ बसून शहराचा विकास कसा करणार याचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट होणार आहे.

गेल्यावर्षी २०२०-२१ या आर्थिक वर्षांचा ३७८० कोटी रकमेचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला होता. ४९.३० लाख अखेरच्या शिलकेसह १८४२.११ कोटी महसुली खर्च आणि १९३७.४० कोटी भांडवली खर्चाचा हा अर्थसंकल्प होता. ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प ३७८० कोटींवर पोहचला असला तरी करोना संकटामुळे मात्र त्यात आता मोठी घट होणार आहे. जवळपास नऊशे कोटी रुपयांनी अर्थसंकल्प कमी करण्यात आला आहे.

करोना संकटामुळे आर्थिक गणित बिघडल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात नव्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आलेला नसून या उलट काही प्रस्तावित प्रकल्पांनाही कात्री लावण्यात आली आहे. सद्य:स्थिती असलेले जुनेच प्रकल्प मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.