मुरबाडजवळील आंबेटेंबे गावातील भीमाई स्मारक प्रकल्प

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई यांचे जन्मगाव असलेल्या मुरबाडजवळील आंबेटेंबे या गावाचा पर्यटन विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. डॉ. आंबेडकरांच्या बालपणीच्या आठवणींना जपण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या भीमाई स्मारकासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्यास समाजकल्याण मंत्र्यांनी तत्त्वत: मंजुरी दिली आहे. तसेच या गावाला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला असून या ठिकाणी स्मारक वास्तूसह, मुला-मुलींचे वसतिगृह, ध्यानधारणा केंद्र, तलाव सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचे औचित्य साधत राज्यातील त्यांचे वास्तव असणाऱ्या गावातील स्मृतींची आणि वास्तूंची जपणूक करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाडजवळील आंबेटेंबे हे गाव बाबासाहेबांचे आजोळ म्हणून ओळखले जाते. या गावात डॉ. आंबेडकरांचे येणे-जाणे होते. त्यामुळे या गोष्टींच्या स्मृती टिकवण्यासाठी काही वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्य सचिवांनी या ठिकाणी भेट देऊन भीमाई स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, निधी उपलब्ध नसल्याने तसेच याकडे प्रशासकीय स्तरावर हालचाली न झाल्याने या स्मारकाची उभारणी रखडली होती. मात्र, आता हे स्मारक वास्तवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.

डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेली राज्यातील २८ स्थळे विकसित करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. त्यासाठी या वर्षांसाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून त्यातूनच आंबेटेंबे येथील स्मारकासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. नुकतेच जिल्हा स्तरावरून या गावाला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा बहाल करण्यात आला. यावेळी ८० लाख २८ रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर त्यातील ४० लाख १४ हजारांचा निधी वितरित करून येथे सभागृह, सार्वजनिक प्रसाधनगृह, विश्रामगृह, वृक्षारोपण, पाणी व्यवस्था अशा कामांसाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. आता राज्य शासनातर्फे ४ कोटी ९८ लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

स्मारक असे असेल..

आंबेटेंबे येथील भीमाई स्मारकात स्मारक वास्तूसह, निवासी शाळा, मुलामुलींचे वसतिगृह, सांस्कृतिक केंद्र, ध्यान धारणा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाव सुशोभीकरण, संरक्षक भिंत, सौर ऊर्जा यंत्र, विद्युत जनित्र, पाणीपुरवठा, वाहनतळ, मलनिस्सारण प्रकल्प असणार आहेत.

जिल्हाधिकारी स्तरावरून ‘क’ दर्जा मिळविल्यानंतर त्यातील महत्त्वाच्या कामाच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. तसेच समाजकल्याण मंत्र्यांनीही ४ कोटी ९८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पूर्ण स्मारकाला ३२ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र सध्या मंजूर निधीतून महत्त्वाची कामे पूर्ण केली जातील.  – राजेश सोमवंशी, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरबाड.