मासुंदा तलाव परिसरात पार्किंग बदल लागू

ठाणे पश्चिम स्थानकातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मासुंदा तलाव परिसरातील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठोस पावले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून नौपाडय़ाच्या धर्तीवर मासुंदा तलाव परिसरात वाहने उभी करण्यासाठी १२ तासांच्या वेळा ठरवून दिल्या आहेत. एकाच जागेवर जास्त वेळ वाहने उभी केली जाऊ नयेत यासाठी वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला असून सुरुवातीला १५ दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर हे बदल लागू करण्यात आले आहेत. या बदलांमुळे ठरवून दिलेल्या वेळेशिवाय रस्त्यावर वाहने उभी केल्याचे आढळून आले तर अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

१५ दिवसांत बदलांबाबत लेखी सूचना किंवा हरकती प्राप्त झाल्या नाहीतर हे बदल कायमस्वरूपी लागू केले जाणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. ठाणे शहराचा मध्यवर्ती परिसर म्हणून मासुंदा तलावाचा भाग ओळखला जातो. ठाणे पश्चिम स्थानकातील वाहतुकीसाठी मासुंदा तलाव परिसरातील रस्ते महत्त्वाचे मानले जातात.याशिवाय, या तलावालगतच शहरातील मोठी बाजारपेठ असून त्या ठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. वाहनांच्या तुलनेत तलाव परिसरातील रस्ते अरुंद झाले असून त्याच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. असे असतानाच तलावालगतच्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीसाठी पुरेसा मार्ग उपलब्ध होत नसल्यामुळे या मार्गावर सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत मोठी कोंडी होते. ठाणे पश्चिम स्थानकातून घोडबंदर, वागळे, वर्तकनगर, टेंभीनाका, कोर्टनाका, उथळसर, खोपट या भागांत जाणाऱ्या रिक्षा आणि टीएमटी बसगाडय़ा मासुंदा तलाव परिसरातील रस्त्यावर वाहतूक करतात. काँग्रेस कार्यालयाजवळील सिग्नल यंत्रणेवर वाहने थांबवून वाहतुकीचे नियोजन केले जाते. मात्र यामुळे वाहनांच्या पाठीमागे लांब रांगा लागतात. तसेच तलाव परिसरातील बेकायदा पार्किंगमुळे सिग्नलवरून येणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. हा कोंडीचा फटका शहरातील अन्य मार्गावरील वाहतुकीला बसतो. ही कोंडी सोडवण्याची मागणी सातत्याने होत होती. या पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी तलाव परिसरात होणारी बेकायदा पार्किंग रोखण्यासाठी पावले उचलली असून त्यासाठी या ठिकाणी वाहन उभी करण्याच्या वेळा निश्चित केल्या आहेत.

असे आहेत बदल..

  • अनेक जण सकाळी मासुंदा तलाव परिसरात वाहने उभी करतात आणि रात्रीच्या वेळेत पुन्हा तेथून वाहन घेऊन जातात. त्यामुळे दिवसभर वाहन तिथेच उभे असते. असे प्रकार रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर पार्किंग बदल लागू केले आहेत.
  • या बदलानुसार सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत साईकृपा हॉटेल ते डॉ. मुस रोडपर्यंत तलावाबाजूकडील रस्त्यावर तर दुपारी ३ ते रात्री १२ या वेळेत गुरू पानटपरी-वस्त्रकला दुकानाकडील बाजूस वाहने उभी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • १५ दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर हे बदल लागू असणार आहेत. या बदलांबाबत लेखी सूचना आणि हरकती पोलिसांनी मागवल्या आहेत.