वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचा फटका; खड्डय़ांमुळे अडथळे

मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा येथील पुलाच्या कामासाठी अवजड वाहनांची वाहतूक बंद करून ही वाहतूक मनोर-वाडा-भिवंडी या राज्य महामार्गावर वळवण्यात आली आहे. यामुळे या राज्य महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून याचा त्रास या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाडय़ातील प्रवाशांना होत आहे. अवघ्या एक तासाच्या प्रवासासाठी तब्बल तीन ते चार तास लागत आहेत.

वर्सोवा पुलाचे काम सुरू झाल्याने या महामार्गावरील बहुतांशी अवजड वाहतूक मनोर-वाडा-भिवंडी या राज्यमार्गावरून सुरू करण्यात आली आहे. हा ६५ किलोमीटर लांबीचा महामार्ग असून या रस्त्याचे अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. हा महामार्ग काही ठिकाणी वनजमिनीतून गेल्याने या ठिकाणी या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम झालेले नाही. या महामार्गावर अनेक ठिकाणी एकेरी वाहतुकीचे टप्पे असल्याने या ठिकाणी नेहमीच अपघात घडतात.

मनोर-वाडा या राज्य महामार्गावर करळगाव येथे देहेर्जा नदीवर असलेला पूल आणि पिंजाळ नदीवर पाली गावाजवळ असलेला जुना पूल अत्यंत कमकुवत आहेत. ८० ते ८५ वष्रे जुने असलेले हे पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्यानेच जाहीर केले आहे. असे असतानाही या जुन्याच पुलावरून मोठय़ा प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने येथील स्थानिक नागरिकांकडून भीती व्यक्त केली जात आहे.

या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत, अनेक ठिकाणी कामे अपुरी आहेत. मात्र वर्सोवा पुलाच्या कामामुळे अवजड वाहनांची वाहतूक वळवण्यात आल्याने वाडा-भिवंडी राज्यमार्गावर मोठय़ा प्रमाणात कोंडी झाली आहे. वर्सोवा पुलाचे काम अजून पुढील महिनाभर सुरू राहणार असल्याने या वाहतूक कोंडीचा त्रास येथील वाहनचालकांना आणि प्रवाशांना एक महिना सहन करावा लागणार आहे.

वाडा येथून दररोज ठाणे, कल्याण, पालघरला कर्मचारी आणि विद्यार्थी जात असतात. मात्र वाहतूक कोंडीचा त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.   – किरण थोरात, सरचिटणीस, वाडा तालुका प्रवासी संघटना

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मनोर-वाडा-भिवंडी राज्य महामार्गावर वळवण्यापूर्वी या मार्गावरील दुरुस्तीची कामे करून घ्यायला हवी होती.    – हृषीकेश सावंत, प्रवासी

वाडा-भिवंडी महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता या मार्गावरील ठाणे, कल्याणकडे जाणाऱ्या काही एसटीच्या बसफेऱ्या शहापूर तालुक्यातील आटगाव रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.     – विजय गायकवाड, एसटी आगार प्रमुख, वाडा