ठाण्यात १३ दिवसांत १ कोटी ३१ लाख रुपयांच्या दंडाची वसुली

ठाणे : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि ई-चलानच्या दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांकडून थकीत दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी १ डिसेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत १३ दिवसांमध्ये पोलिसांनी १ कोटी ३१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर उर्वरित वाहनचालकांनी दंडाची रक्कम लवकरात लवकर भरावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात १४ फेब्रुवारी २०१९ पासून ई चलान प्रणालीद्वारे दंडाची आकारणी करण्यात येते. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनाच्या क्रमांकाचे छायाचित्र वाहतूक पोलीस काढून तो प्रणालीत टाकतात आणि त्याआधारे संबंधित वाहनचालकाला दंडाची रक्कम आकारली जाते. या संबंधीचा संदेश वाहन मालकाच्या मोबाइल क्रमांकावर पाठविण्यात येतो. संबंधित वाहन चालकाला त्या दंडाची रक्कम ऑनलाइन किंवा वाहतूक पोलिसांकडे असलेल्या यंत्राद्वारे भरता येते. मात्र, अनेकदा वाहनचालक त्यांच्या दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात. याच चालकाने पुन्हा कायद्याचे उल्लंघन केले तर त्याच्यावर पुन्हा अशाच प्रकारे दंड आकारणी होते. १४ फेब्रुवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत निमय मोडल्याची ६ लाख ३० हजार २०४ प्रकरणे दाखल झाली होती. या कारवाईच्या दंडाची रक्कम २१ कोटी १४ लाख रुपये आहे. तर, जानेवारी ते १३ डिसेंबर २०२० या कालावधीत ४ लाख २३ हजार प्रकरणे दाखल झाली आहेत. या प्रकरणांच्या दंडाची रक्कम २५ कोटी ५ लाख इतकी आहे. मार्च महिन्याच्या अखेरीपासून करोनाच्या संसर्गामुळे लागू झालेल्या टाळेबंदीत दंड वसुली रोडवली होती. मात्र, सध्या टाळेबंदीमध्ये शिथिलता आल्याने थकीत ई चलानच्या दंड वसुलीसाठी ठोस मोहीम राबविण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना दिले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व वाहनचालकांना २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दंड भरण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही अनेकांनी दंडाची रक्कम न भरल्यामुळे १ डिसेंबरपासून धडक कारवाई सुरू झाली आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या मार्गावर तपासणी करून थकीत दंडाच्या रकमेची वसुली करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत दररोज सरासरी १० लाख रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे १३ दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांनी १ कोटी ३१ लाख रुपयांच्या घसघशीत दंड वसूल केला आहे. तुमच्या वाहनाने कशा पद्धतीने आणि कोणत्या ठिकाणी वाहतुकीचा नियम मोडला आहे, याची सविस्तर माहिती ई चलानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. त्या पोर्टलच्या माध्यमातून चार वेगवेगळ्या पर्यायांचा उपयोग करून दंड भरण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध आहे. त्यामुळे वाहनांवरील कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी तात्काळ दंड भरावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.