ठाणे : महापालिका स्थायी समिती सभापती आणि गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली परिवहन समिती सभापतिपदाची निवडणूक येत्या १८ नोव्हेंबरला होणार आहे. महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असल्याने दोन्ही समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, या दोन्ही पदांवर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय येत्या १२ नोव्हेंबरला महापालिकेच्या पाच विशेष समित्यांवर सदस्यांची निवड केली जाणार आहे.

करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिका स्थायी समिती सभापती तसेच पाच विशेष समिती सदस्यांची निवड प्रक्रिया रखडली होती. तसेच परिवहन समिती सदस्यांची निवड झाली असली तरी गेल्या दोन वर्षांपासून समिती सभापतिपदाची निवडणूक झाली नव्हती. करोना संकटामुळे या निवडणुका होणार की आणखी लांबणीवर पडणार, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. असे असतानाच महापालिका प्रशासनाने आता या सर्वच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ठाणे महापालिका स्थायी समिती सभापती आणि परिवहन समिती सभापतिपदाची निवडणूक येत्या १८ नोव्हेंबरला ऑनलाइन होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ११ नोव्हेंबरला दाखल करण्यात येणार असून त्याच दिवशी ही निवडणूक होणार की बिनविरोध निवड होणार, हे चित्र स्पष्ट होणार आहे. महिला व बालकल्याण समिती, क्रीडा समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य परीक्षण आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती अशा महापालिकेच्या पाच विशेष समित्या आहेत. या समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड करण्यात येणार असून त्यासाठी येत्या १२ नोव्हेंबरला ऑनलाइन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे समिती सदस्यपदावर कुणाची वर्णी लागणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.