डोंबिवलीत ९ रिक्षा जप्त; कल्याण-डोंबिवलीत अचानक तपासणीमुळे रिक्षा चालकांची गाळण उडाली

कल्याण-डोंबिवली शहरात मुदत संपलेल्या रिक्षा मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर येत आहेत. या रिक्षा वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. वाहनतळ सोडून हे चालक व्यवसाय करीत असल्याने वाहतुकीचे नियोजन बिघडत आहे, अशा तक्रारी जागरूक प्रवाशांनी कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन परिवहन अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी डोंबिवलीत सापळे लावून नऊ रिक्षाचालकांच्या भंगार रिक्षा जप्त केल्या.

‘लोकसत्ता ठाणे’ने गेल्याच आठवडय़ात कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या परिसरात मुदत संपलेल्या, परवाना नसलेले अनेक रिक्षाचालक बेकायदा व्यवसाय करीत आहेत. हे बेशिस्त रिक्षाचालक वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कारवाई होईल, या भीतीने रेल्वे स्थानकांच्या लगत रिक्षा उभ्या करून घाईघाईने प्रवासी भरणे, रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारात रिक्षा उभ्या करणे, वाहनतळावर न जाणे, असे उद्योग करीत असल्याचा विषय मांडला होता. त्याचबरोबर ही माहिती काही जागरूकांनी ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांना दिली होती.

कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक, डोंबिवली विभागाचे प्रमुख अशोक शिंदे यांनी गुरुवारी सकाळी अचानक डोंबिवलीत रेल्वे स्थानकांच्या पूर्व आणि पश्चिम भागात रिक्षा चालकांकडील कागदपत्रे, परवान्यांची तपासणी सुरू केली. कोणतीही पूर्वसूचना न देता ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू झाल्याने रिक्षा चालकांची गाळण उडाली. काही वाहनतळावर, रस्त्यावर उभे असलेले रिक्षाचालक ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकले.

नऊ रिक्षाचालक परवाना संपलेला असताना, रिक्षाची मुदत संपली (भंगार) असताना रिक्षा चालवत असल्याचे नाईक व शिंदे यांच्या निदर्शनास आले. तातडीने या रिक्षा जप्त करण्यात आल्या. या रिक्षाचालकांनी परवाना संपला असताना, नियमबाह्य रिक्षा चालवली म्हणून त्यांच्याकडून रीतसर दंड वसूल केला जाईल. त्यांची रिक्षा भंगारात काढून त्यांना नवीन परवान्यासाठी सहकार्य केले जाईल, असे नंदकिशोर नाईक यांनी सांगितले. या सर्व रिक्षा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या परिसरात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी नियमबाह्य रिक्षा चालविणाऱ्या चालकांवर कारवाई केली तर, जप्त केलेल्या रिक्षा ठेवायच्या कोठे असा मोठा प्रश्न ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांसमोर आहे. सर्वच पोलीस ठाण्याच्या जागा तुटपुंज्या आहेत. त्या आवारात अन्य वाहने, न्यायालयीन वादाची वाहने उभी असतात. डोंबिवलीत फक्त रामनगर पोलीस ठाण्याच्या जागेत प्रशस्त जागा आहे. पण तेथे टोईंग व्हॅनने उचललेली वाहने उभी असतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरात नियमित अचानकपणे तपासणी करण्यात येणार आहे. चालकाकडे वाहनचालक परवाना, रिक्षेची कागदपत्रे आहेत की नाहीत, याची पडताळणी करण्यात येईल. जे रिक्षाचालक नियमबा, रिक्षेची मुदत संपली आहे, तरी ते रिक्षा चालवत असतील तर त्यांची वाहने जप्त करण्यात येतील. मोटार वाहन कायद्याप्रमाणे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.