ओळखपत्र तपासून प्रवासाला परवानगी; गल्ल्या, रस्ते, बाजारपेठांत शुकशुकाट

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत गुरुवारपासून सुरू झालेल्या टाळेबंदीचे पहिल्या दिवशी काटेकोर नियोजन झाल्याचे दिसून आले. एकीकडे, एकीकडे पोलीस बंदोबस्त आणि गल्ली-बोळांत उभारलेल्या मार्गरोधकांमुळे बाजारांत शुकशुकाट पाहायला मिळत होता तर, दुसरीकडे नोकरीनिमित्त मुंबईकडे निघालेल्या नोकरदारांच्या वाहनांची गर्दी महामार्ग आणि मुख्य रस्त्यांवर पाहायला मिळाली. मात्र, या नोकरदारांनाही ओळखपत्र तपासून सोडण्यात येत असल्याने गुरुवारी फारसा गोंधळ झाला नाही. याबद्दल ठाणेकरांनीही समाधान व्यक्त केले.

महापालिका क्षेत्रामध्ये गुरुवारी सकाळी इंदिरानगर आणि जांभळी नाक्यावरील भाजी मंडई वगळता संपूर्ण शहरात किराणा माल, भाजीपाला आणि इतर दुकाने बंद होती. शहरातील पेट्रोल पंपांवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या आणि ई-पास असलेल्या वाहनांनाच इंधन दिले जात होते. शहरातील नाक्यांवर तैनात असलेल्या पोलिसांकडून अत्यावश्यक सेवेसह शासकीय आणि खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची वाहने ओळखपत्र पाहून सोडली जात होती. टीएमटीच्या बसगाडय़ांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जात होता, तर बेस्ट बसगाडय़ांमध्ये अत्यावश्यक सेवेसह खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांनाही प्रवेश दिला जात होता. मात्र टाळेबंदीमुळे खासगी कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांनी घरीच राहणे पसंत केल्याने बस थांब्यावर फारशी गर्दी नव्हती.

नौपाडा, वागळे इस्टेट, कोपरी, लोकमान्यनगर- सावरकरनगर, वर्तकनगर, वसंतविहार, घोडबंदर, कळवा आणि मुंब्रा या सर्वच ठिकाणी किराणा मालासह, भाजीपाला आणि इतर दुकाने बंद असल्याचे दिसून आले. शहरातील इंदिरानगर आणि जांभळी नाक्यावरील भाजी मंडईच केवळ सुरू होती. मात्र या ठिकाणी फारशी गर्दी नव्हती.

शेअर रिक्षा बंद असल्यामुळे कळवा परिसरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी ठाणे स्थानकापर्यंत पायपीट केली. तर खासगी कर्मचारी रिक्षांच्या शोधात उभे असल्याने या ठिकाणी काही प्रमाणात गर्दी दिसून आली. ठाणे, कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर परिसरांत पोलिसांची पथके तैनात करण्यात आली होती. तसेच कोपरी, आनंदनगर, तीनहात नाका, मॉडेला चेक नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन, कापूरबावडी, पातलीपाडा, गायमुख यांसह शहराच्या अंतर्गत भागातील चौकांमध्ये पोलिसांनी नाकाबंदी केली होती.

या ठिकाणी अत्यावश्यक सेवेखेरीज अन्य गोष्टींसाठी बाहेर पडलेल्यांची वाहने जप्त केली जात होती.

ओळखपत्र पाहूनच इंधन

ठाणे महापालिका क्षेत्रातील पेट्रोल पंपांवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ई-पास असलेल्या वाहनांना इंधन दिले जात होते, तर खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याने ओळखपत्र दाखवून विनंती केल्यानंतर त्याला इंधन दिले जात होते. पेट्रोल पंपचालकांनी अशाप्रकारचे निर्बंध कशामुळे लावले आहेत, याबाबत तेथील कर्मचाऱ्यांनाही सांगता येत नव्हते. तर अशा प्रकारचे आदेश दिलेले नसल्याचे पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडमून सांगण्यात आले.

रिक्षांतून छुपी वाहतूक

बाळकुम ते काल्हेर मार्गावर शेअर रिक्षांमधून प्रवाशांची वाहतूक सुरू होती. बाळकुम येथील नाक्यावर पोलिसांची नाकाबंदी असल्यामुळे रिक्षाचालक नाक्याच्या अलीकडेच प्रवाशांना खाली उतरवीत होते आणि नाक्यावरून रिकामी रिक्षा पुढे नेत होते. त्यानंतर प्रवासी चालत पुढे येऊन रिक्षामध्ये बसत होते. अशाप्रकारे रिक्षांमधून छुपी वाहतूक सुरू होती.

टीएमटीच्या ५५ बस रस्त्यावर

गेल्या काही दिवसांपासून ठाणे परिवहन उपक्रमाच्या १२० ते १३० बसगाडय़ा प्रवासी सेवेसाठी रस्त्यावर धावत होत्या. मात्र टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार सकाळपासून टीएमटीच्या केवळ ५५ बसगाडय़ा रस्त्यावर धावत होत्या.

पोलीस-प्रशासन मतभेद

ठाणे महापालिकेने जीवनावश्यक दुकानेही बंद राहणार असल्याचे आदेश काढले होते. मात्र जांभळीनाका भाजी मंडई आणि काही अन्नधान्य विक्रीची दुकाने सुरू होती. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, भाजी मार्केट उघडण्यास आम्ही परवानगी दिली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तर भाजी आणि अन्नधान्याची दुकाने अत्यावश्यक सेवेत मोडणारी आहेत. त्यामुळे सकाळी जांभळीनाका भाजी मार्केट सुरू होते. मात्र, नागरिकांची गर्दी भाजी मार्केटमध्ये आम्ही होऊ दिली नाही, असे ठाण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी सांगितले.