News Flash

ठाण्यात पावसाळापूर्व वृक्षछाटणी सदोष?

पावसाळय़ापूर्वी फांद्यांची छाटणी करण्याचे पालिकेचे धोरण चुकीचे असून ही छाटणी हिवाळय़ात व्हायला हवी होती, असे पर्यावरण अभ्यासक म्हणत आहेत.

शास्त्रीय पद्धतीने फांदी छाटणी होत नसल्याने झाडांना धोका

दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे ठाणे शहरातील तब्बल नऊ वृक्ष उन्मळून पडल्याचा दावा महापालिकेमार्फत केला जात असला तरी प्रत्यक्षात हे प्रमाण पहिल्याच पावसात ३० पेक्षा अधिक असल्याची माहिती पुढे येत आहे. दुसरीकडे, वृक्षछाटणीच्या कामांवर लाखो रुपयांचा खर्च करूनही ती अशास्त्रीय पद्धतीनेच केली जात असल्याची पर्यावरणप्रेमींची तक्रार आहे. पावसाळय़ापूर्वी फांद्यांची छाटणी करण्याचे पालिकेचे धोरण चुकीचे असून ही छाटणी हिवाळय़ात व्हायला हवी होती, असे पर्यावरण अभ्यासक म्हणत आहेत. विशेष म्हणजे, फांदी छाटण्यासाठी अशास्त्रीय पद्धत वापरण्यात येत असल्याने त्याचा वृक्षांनाच धोका होत असल्याचा दावाही करण्यात येत आहे.

पावसाळ्यात झाडे उन्मळून पडू नयेत यासाठी दर वर्षी पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर वाढलेल्या फांद्या छाटण्याचे काम महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून करण्यात येते. आठवडय़ाभरापूर्वी शहरात वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र वृक्ष पडू नयेत यासाठी हिवाळ्यात नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत झाडांना पालवी फुटण्याआधी फांद्या कापणे हे शास्त्रीयदृष्टय़ा योग्य असल्याचे अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे. वृक्षाच्या फांद्या कापताना अष्टबाजूंनी कापणे गरजेचे असते. या वृक्षछाटणीत वृक्षाच्या लहान फांद्या कापाव्या लागतात. मात्र ठाणे महानगरपालिकेतर्फे होणाऱ्या वृक्षछाटणीत मोठय़ा फांद्या कापण्यात येत असून शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करत नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. कंत्राटदार चुकीच्या पद्धतीने वृक्षछाटणी करत असून रस्त्यावर वाढलेल्या एकाच बाजू्च्या फांद्या कापण्यात येत आहेत.

वृक्षाचा समतोल साधण्यासाठी तोडलेल्या फांद्याच्या विरुद्ध दिशेची फांदी तोडणेही आवश्यक असते. मात्र शहरात सुरू असलेली वृक्षछाटणी अभ्यासपूर्ण होत नसल्याने येत्या पावसाळ्यात ही झाडे उन्मळून पडण्याची भीती वृक्ष अभ्यासकांच्या वतीने वर्तवण्यात येत आहे.

यंदा पहिल्याच पावसात शहरात काही परिसरांत तीसपेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली. वळवाच्या पावसात झाडे पडण्याचे प्रकार घडत असले तरी चुकीच्या पद्धतीने होणारी वृक्षछाटणी यासाठी कारणीभूत आहे, असे पर्यावरण अभ्यासक सुनीती मोकाशी यांनी सांगितले.

यासंबंधी महापालिकेचे उद्यान अधिकारी केदार पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दाव्यानुसार शहरात आतापर्यंत नऊ झाडे उन्मळून पडल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात हा आकडा ३० पर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती वृक्ष प्राधिकरणातील एका माजी सदस्याने दिली.

सर्वेक्षण महत्त्वाचे

वृक्षछाटणी करताना संबंधित वृक्षांचा अभ्यास होणे अपेक्षित असते. वृक्ष असलेल्या रस्त्यावर मार्गक्रमण होणाऱ्या वाहनांच्या हालचालींमुळे वृक्षांची मुळे थरथरतात. यासाठी वृक्ष असलेल्या रस्त्यावर दिवसाला किती वाहने मार्गक्रमण करतात याचाही अभ्यास होणे गरजेचे असते. मात्र वृक्षछाटणी करणाऱ्या पथकात वृक्षतज्ज्ञांची नेमणूक नसल्याने कंत्राटदार चुकीच्या पद्धतीने वृक्षछाटणी करत आहेत. याचा मोठय़ा प्रमाणात परिणाम वृक्षांच्या मुळावर होत असून येत्या पावसाळ्यात जास्त वृक्ष पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वृक्ष अभ्यासक प्रा. डॉ. नागेश टेकाळे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 1:52 am

Web Title: tree cutting before monsoon tmc
Next Stories
1 अग्निशमन दलाकडे निकृष्ट यंत्रणा
2 आपत्कालीन व्यवस्थापनेचा ‘टोल फ्री’ क्रमांक चुकीचा
3 मुख्यमंत्र्यांच्या ठाणे दौऱ्यामुळे वाहनचालकांची कोंडीतून तात्पुरती सुटका
Just Now!
X