आंतरजातीय प्रेमसंबंध ठेवल्याने होणाऱ्या छळास कंटाळून १९ वर्षीय आदिवासी तरुणीने विषप्राशन करून आत्महत्या केली. विरारच्या चांदीप येथे ही घटना घडली. विरार पोलिसांनी याप्रकरणी चौघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

विरारच्या चांदीप गावातील डोंगरपाडा येथे ऊर्मिला कोती (१९) ही आदिवासी तरुणी राहात होती. गुरुवारी रात्री तिने राहत्या घरात कीटकनाशक प्राशन केले. तिला उपचारासाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. ऊर्मिलाचा भाऊ भूषण कोती याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार ऊर्मिला आणि प्रसाद पाटील या दोघांचे प्रेमसंबध होते. परंतु प्रसादच्या कुटुंबीयांना ऊर्मिला आदिवासी असल्याने हे संबंध मान्य नव्हते. त्यामुळे प्रसादचे आई-वडील आणि भाऊ तिला शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत होते. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे कोती याने म्हटले आहे. कोती याने दिलेल्या तक्रारीवरून विरार पोलिसांनी बुधाजी पाटील, नयना पाटील आणि जयेश पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास विरार पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक बी. पी. भोईर करत आहेत. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.