आधारवाडी कारागृहातून दोन कैदी पळून गेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कैदी पळाल्याचे लक्षात येताच तुरुंगातील पोलिसांची एकच धावपळ उडाली. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अंधाराचा फायदा घेत या दोन्ही कैद्यांनी येथून पलायन केले.

मणीशंकर नाडर आणि डेव्हिड देवेंद्रन अशी या फरार कैद्यांची नावे आहेत. कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी कारागृहात मणीशंकर नाडर आणि डेव्हिड देवेंद्रन हे दोन कैदी शिक्षा भोगत होते. यामधील मणीशंकर नाडर या आरोपीला महात्मा फुले पोलिसांनी तर डेव्हिड देवेंद्रन याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली होती. या दोघांवर दरोडे आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना कल्याण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली होती.

मागील वर्षभरापासून अधिक काळ ते आधारवाडी कारागृहात असून आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या दोघांनी जेलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायरचे दोरखंड बनवून जेलच्या मागील बाजूस असलेल्या भिंतीवरून उड्या टाकून पळ काढला. ही बाब लक्षात येताच तुरुंगातील पोलिसांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत हे दोघे निसटले. खडकपाडा पोलीस पसार झालेल्या या दोन्ही कैद्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, या कैद्यांच्या शोधासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.