भाजपच्या पंचम कलानींना साई पक्षाच्या ज्योती बठिजा यांचे आव्हान

उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार याचा निकाल शुक्रवारी लागणार आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे तिढा जरी वाढला असला, तरी भाजपच्या पंचम कलानींची बाजू भक्कम झाल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे साई पक्षाच्या फुटीर नगरसेवकांना शिवसेनेने साथ दिल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. भाजपच्या पंचम कलानी यांच्यासमोर साई पक्षाच्या फुटीर ज्योती बठिजा यांचे आव्हान आहे.

सव्वा वर्षांपूर्वी साई पक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला साई पक्षाच्याच फुटीर नगरसेवकांनी नाकी नऊ  आणले आहेत.  महापौरपद हे भाजप आणि त्यातही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपाइं आणि इतर विरोधी पक्षांच्या मदतीने विरोधी गटाच्या नगरसेवकांची संख्याही ३८ पर्यंत पोहोचत असल्याने भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यात भाजपच्या एका सदस्याचे पद रद्द झाल्यानंतर दुसऱ्या एका नगरसेवकाचेही पद रद्द झाल्याचेही सांगण्यात येते.  भाजपचा गट गोव्यात तर शिवसेनेचा गट पालघर येथे तळ ठोकून असल्याचे कळते. या सत्तेच्या खेळात आकडे समसमान झाल्याने पीआरपी, कॉंग्रेस आणि भारिपच्या एक एक सदस्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. हे नगरसेवक कुणाच्या पारडय़ात मत टाकतात यावरून महापौरपदाचा निकाल लागणार आहे. सध्या तरी भाजपच्या पंचम कलानी यांचे पारडे जड वाटत असले, तरी सभागृहात कोणता पक्ष काय भूमिका घेतो यावरून सत्तेचे गणित जुळणार आहे.