लहान मुलांच्या लशींचा साठा चोरटय़ांनी पळवला

अंबरनाथ : येथील मांगरूळ आरोग्य केंद्रातून मध्यरात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी लहान मुलांना विविध आजारांवर देण्यात येणाऱ्या लशींचा साठा लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारच्या मध्यरात्री आरोग्य केंद्रातील खिडकीचे लोखंडी गज तोडून चोरटय़ांनी आत प्रवेश करत ही चोरी केली आहे.

या प्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. चोरटय़ांनी करोना प्रतिबंधात्मक लस समजून या लशींची चोरी केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरातील नागरिकांना मांगरूळच्या आरोग्य केंद्रात करोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. रविवारी रात्री करोना लस वगळता आरोग्य केंद्रात पोलिओ, टीबी, गोवर, रुबेला, घटसर्प, डांग्या खोकला, जुलाब इत्यादी आजारांवर लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लशींचा साठा होता. यातील काही लशी या सीरम कंपनीच्या होत्या. यामुळे नाव सारखे असल्याने चोरटय़ांनी या लशींच्या बाटल्या पळवल्या असल्याचे म्हटले जात आहे. लशींच्या साठय़ाबरोबरच चोरटय़ांनी केंद्रातून सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहण्याचा मॉनिटरदेखील चोरून नेला आहे. सोमवारी सकाळी आरोग्य केंद्रामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी आत प्रवेश केला असता, रुग्णालयातील या सर्व लशी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

एकीकडे संपूर्ण जिल्ह्य़ात लशींचा मोठा तुटवडा जाणवत आहे, तर अनेक ठिकाणी लस मिळवण्यासाठी वशिलेबाजी होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना या सर्व गोष्टींचा मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. असे असतानाचा ग्रामीण भागातील एका आरोग्य केंद्रातून लहान मुलांना देण्यात येणारा लशींचा साठा चोरीला जाण्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. मांगळूर रुग्णालय प्रशासनाने यासंबधी उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस ठाण्यात माहिती दिली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.