11 December 2017

News Flash

वडापाव विक्रेत्याला जिवंत पेटवले

उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्व प्रवेशद्वाराच्या समोर मुंबई महालक्ष्मी जंबो वडा पावचे दुकान आहे.

प्रतिनिधी, उल्हासनगर | Updated: March 21, 2017 3:18 AM

दोन-अडीच वर्षांपूर्वी आपण सोडलेल्या दुकानात वडापावचा धंदा करणाऱ्यावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर येथे सोमवारी सकाळी घडला. व्यवसायातील स्पर्धेतून हे कृत्य घडल्याचे उघड झाले असून पेटवून देण्यात आलेल्या विक्रेत्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते, तर हल्ला करणारा विक्रेता फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके नेमण्यात आली आहेत.

उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्व प्रवेशद्वाराच्या समोर मुंबई महालक्ष्मी जंबो वडा पावचे दुकान आहे. हे दुकान पूर्वी सुरेश आहुजा हा भाडय़ाने चालवत होता. सुरेशही वडापाव, पॅटिसचा व्यवसाय करत होता. मात्र भाडे परवडत नसल्याने त्याने हे दुकान सोडले होते. ते चंदरलाल रामरख्यानी (४९) यांनी चालवण्यास घेतले होते. त्यात विविध खाद्यपदार्थ मिळू लागल्याने चंदरलाल यांचा व्यवसाय तेजीत होता. चंदरलाल यांची भरभराट पाहून सुरेश याने ईष्र्येतून याच दुकानासमोर स्वत:चे वडापावचे दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला; परंतु चंदरलालने त्याला विरोध केला. याच रागातून सुरेश याने सोमवारी सकाळी चंदरलाल यांच्या दुकानात जाऊन त्यांच्या अंगावर रॉकेल ओतले व त्यांना पेटवून पळ काढला. पसरलेल्या रॉकेलमुळे काही क्षणांतच चंदरलाल प्रचंड भाजले गेले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या अन्य दुकानदारांनी आग विझवून चंदरलाल यांना तातडीने मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु चंदरलाल हे १०० टक्के भाजले असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. त्यामुळे त्यांना ऐरोली येथील बर्न सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर पसार झालेल्या आहुजाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार केली आहेत.

First Published on March 21, 2017 3:15 am

Web Title: vadapav seller burnt alive by another vadapav seller in ullhasnagar