|| सुहास बिऱ्हाडे

बेकायदा प्रवासी वाहतुकीचा फटका; वाहतूक पोलिसांची कारवाई थंडावली

वसईतील राजरोसपणे सुरू असलेल्या बेकायदा प्रवासी वाहतुकीचा फटका पालिकेच्या परिवहन सेवेला बसला आहे. या बेकायदा वाहतुकीमुळे दिवसाकाठी पालिकेचे दहा हजार प्रवासी कमी झाले आहे. वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई होत नसल्याने खासगी प्रवासी वाहतूक वाढली आहे.

वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा सध्या तोटय़ात गेली आहे. शहरात बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे आणि ‘अर्थ’पूर्ण संबंधामुळे बेकायदा प्रवासी वाहतूक फोफावली आहे. त्याचा फटका पालिकेच्या परिवहन सेवेला बसू लागला आहे. वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा मे. भगीरथी ट्रान्स्पोर्ट या ठेकेदारामार्फत चालवली जाते. दररोज ३८ मार्गावर ८०० फेऱ्या होत असतात. या बसमधून दररोज सुमारे १ लाख प्रवासी प्रवास करत असतात. परंतु परिवहन सेवेचे प्रवासी या खासगी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांनी पळवले आहे. त्यामुळे दररोज दहा हजारांनी प्रवासी कमी झाल्याची माहिती परिवहन सेवा चालविणाऱ्या मे. भगीरथी ट्रान्स्पोर्टचे संचालक मनोहर सत्पाळ यांनी दिली. आमचे दररोज दहा ते बारा हजारांनी प्रवासी घटल्याचे सत्पाळ यांनी सांगितले. सर्वाधिक बेकायदेशीर प्रवासी वाहतूक ही वालीव आणि सातिवली मार्गावर होत असल्याचे ते म्हणाले.

कारवाई थंडावली

वाहतूक पोलिसांनी बेकायदा प्रवासी वाहतुकीविरोधात कारवाई करत असल्याचा दावा केला आहे. मात्र चालू वर्षांतील पाच महिन्यांत केवळ ६३ जणांवर कारवाई झाली आहे. मे महिन्यात तर अवघ्या तीन वाहनांवर कारवाई झाली आहे. बेकायदा प्रवासी वाहतूक होत आहे ही वस्तुस्थिती आहे असे वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी सांगितले. मात्र त्याविरोधात कारवाई केली जाते. यापुढे अशा वाहतूकदारांवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

  • सार्वजनिक परवानाधारक वाहनांशिवाय कुठल्याही खासगी वाहनांना टप्पा वाहतूक करण्यास परवानगी नाही. वसई पूर्वेच्या सातिवली, वालीव, भोयदापाडा, अग्रवाल इस्टेट या भागात औद्योगिक कंपन्या आहेत.
  • या कंपन्यांच्या बसेस आपल्या कर्मचाऱ्यांची रेल्वे स्थानक परिसरातून ने-आण करतात. परत जाताना या बसेस रिकाम्या असतात. त्या वेळी हे वाहनचालक प्रवासी घेऊन जातात. बसचा तिकीट दर हा दहा रुपये असेल तर या खासगी बसमध्ये पाच रुपये दर आकारून प्रवासी घेऊन जातात.
  • वसई पश्चिमेला अंबाडी रोड जवळ वाहतूक पोलीस ठाणे आहे. त्यांच्या समोरूनदेखील बेकायदेशीर प्रवासी वाहतूक राजरोस होत असते. रिक्षांमधूनही अधिक प्रवासी भरून नेले जातात.