ठाणे : मराठीतील प्रसिद्ध कवी, संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचे शुक्रवारी रात्री पेण येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि नातवंड असा परिवार आहे. ठाणे वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास काळसेकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कवी, संपादक, अनुवादक, लघुनियतकालिक आणि माक्र्सवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, अशी सतीश काळसेकर यांची ओळख होती. त्यांच्या वाङ्मयीन कारकीर्दीची सुरुवात काव्य लेखनाने झाली. महाविद्यालयाच्या नियतकालिकातून, नवाकाळ, मराठा  यांसारख्या वर्तमानपत्रातूनही त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. १९७१ साली त्यांचा इंद्रियोपनिषद् हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. तसेच हिंदी, बंगाली, मल्याळम, इंग्रजी, पंजाबी यांसह अन्य भारतीय भाषांमध्ये त्यांच्या कवितांचे अनुवाद झाले. त्यांनी देशी- विदेशी भाषांतील अनेक महत्त्वाच्या कवींच्या कवितांचे मराठी अनुवाद केले आहेत.

Senior Gandhian Dhirubhai Mehta passed away
ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी
Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
central government, appoints manoj panda
वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा, डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड

महानगरीय जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रसंगात येणारे उत्कट भावनात्मक अनुभव हा काळसेकर यांच्या कवितेचा गाभा होता. ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. साठोत्तरीतील नवसाहित्याची सुरुवात करणाऱ्या चळवळीचे ते अग्रणी कार्यकर्ते होते. काळसेकर यांनी मागोवा, तात्पर्य, लोकवाङ्मय, फक्त, तापसी, चक्रवर्ती आणि आपले वाङ्मय वृत्त इत्यादी नियतकालिकांची संपादकीय जबाबदारी सांभाळलेली आहे. मराठी प्रकाशनाच्या क्षेत्रातील लोकवाङ्मय गृह, मुंबई या प्रकाशन संस्थेच्या संपादनाचे कार्य त्यांनी केले आहे. राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे ते सदस्यदेखील होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे उभारण्यात आलेल्या अनेक आंदोलनात ते सहभागी झाले होते. काळसेकर यांचे व्यक्तिमत्त्व कायमच संवादी असल्याने त्यांनी सर्वच क्षेत्रांत अनेक माणसे जोडली.

मिळालेले पुरस्कार…

सोव्हिएत लँड नेहरू पारितोषिक (१९७७), लालजी पेंडसे पुरस्कार (१९९७), बहिणाबाई पुरस्कार : कवी (१९९८), कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद (१९९८), महाराष्ट्र शासन पुरस्कार (१९९९), कैफी आझमी पुरस्कार (२००६), महाराष्ट्र शासनाचा कृष्णराव भालेकर पुरस्कार (२०१०-२०११), सार्वजनिक वाचनालय, बेळगाव संस्थेतर्फे आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार (२०१३ ), साहित्य अकादमी पुरस्कार (२०१३), महाराष्ट्र फाऊंडेशन ग्रंथ पुरस्कार (२०१८).

कवितासंग्रह

इंद्रियोपनिषद् (१९७१), साक्षात (१९८२), विलंबित (१९९७)अनुवाद: लेनिनसाठी (१९७७, लेनिनवरच्या विश्वातील कविता-अनुवाद व संपादन), नव्या वसाहतीत (२०११, अरुण कमल यांच्या हिंदी कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद)

गद्य लेखन

वाचणाऱ्याची रोजनिशी (२०१०), पायपीट (२०१५)हे त्यांचे गद्य लेखन प्रकाशित झाले आहेत. मी भयंकराच्या दारात उभा आहे (नामदेव ढसाळ यांची कविता, संपादन – प्रज्ञा दया पवारसह, २००७), आयदान: सांस्कृतिक ठेवा (संपादन- सिसिलिया काव्र्हालोसह, २००७), निवडक अबकडइ (संपादन- अरुण शेवतेसह, २०१२)ही त्यांनी केलेली संपादने प्रकाशित आहेत.

सतीश काळसेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग येथील वेंगुर्ले तालुक्यातील काळसे गावात झाला आहे. त्यांचे शालेय शिक्षणही गावात पूर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ मासिक ज्ञानदूत आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. यानंतर त्यांनी ३६ वर्षे बँक ऑफ बडोदा येथे नोकरी केली.

सतीश काळसेकरांच्या कारकीर्दीत लोकवाङ्मय गृहतर्फे लक्षणीय पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. यातील अनेक पुस्तकांना मानाचे पुरस्कारदेखील मिळाले आहेत. नवोदित लेखक आणि कवींचे लिखाण राज्यभरात पोहचविण्यात त्यांनी खूप मोलाची भूमिका बजावली. – राजन बावडेकर, प्रकाशक, लोकवाङ्मय गृह, मुंबई

पुस्तकांसोबतच हिंडण्याचा छंद त्यांना होता. त्यांच्यामुळे मलाही ३ वेळा हिमालयात जाण्याची संधी मिळाली. लोकवाङ्मयगृहाशी संबंध आल्यानंतर अनेकदा भेटीगाठी झाल्या. ते आमच्या काळातील महत्त्वाचे कवी

होते.   – वसंत आबाजी डहाके , कवी

 

सतीश जेवढ्या तन्मयतेने जागतिक साहित्य वाचत तेवढ्याच तन्मयतेने नवोदितांच्या संहिताही वाचत. त्यामुळे त्यांनी लोकवाङमयगृहाला अनेक नवोदित कवी, कादंबरीकार जोडून दिले. त्यांचा संचार महाराष्ट्रभर होता.  – जयप्रकाश सावंत, लेखक

 

दोन दिवसांपूर्वी काळसेकर यांच्या पत्नीचा फोन आला होता. आंबेघर सोडतोय असे वहिनी म्हणाल्या आणि दोनच दिवसांत सतीश काळसेकर ते घरच सोडून गेले. त्यांचे निसर्गावर अतिशय प्रेम होते. वर्षातून एकदा ते हिमालयात जायचे. ते अवघा देश फिरले आहेत. पुनर्जन्म असेलच तर भारतातील प्रत्येक राज्यासाठी मला एक जन्म हवा आहे असे म्हणायचे. – आनंद विंगकर, लेखक

 

जगणे शिकवणारे चांगले पुस्तक हरवल्यावर काहीतरी मौल्यवान गमावल्याचे दु:ख वाटते, तसे काळसेकर नावाचे  पुस्तक हरवल्यामुळे वाटत आहे. – किरण येले, कवी, कथाकार

काळसेकर यांचे लोकवाङ्मयगृहाशी घनिष्ठ संबंध होते. त्यांचे वाङ्मयवृत्त हे सदर वाचनीय होते. अतिशय मनमिळाऊ असा स्वभाव होता. मी त्यांना कधी कु णाशी भांडताना पाहिले नाही. त्यांच्याभोवती मित्रमंडळींचा गोतावळा बराच होता.  – सुकुमार दामले, संचालक, लोकवाङ्मयगृह प्रकाशन

लघु अनियतकालिकांच्या काळात साठोत्तरी कवितेमध्ये दमदारपणे पुढे आलेल्या कवींपैकी एक सतीश काळसेकर होते. त्यांनी मराठी कवितेला एका नव्या वळणावर आणून उभे केले. ते पुस्तकांवर आणि नव्या लिहित्या माणसांवर प्रेम करणारे होते. – डॉ. अरुणा ढेरे,  लेखिका