भिवंडीतील आदर्श विद्यालयाचा उपक्रम; ‘किंडल’मुळे वाचनरुचीत वाढ

डिजिटलायझेशनमुळे वाचनाची गोडी लागून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लळा लागल्याचे भिवंडीतील कुरुंद गावातील शाळेत दिसून आले आहे. गावातील आदर्श विद्यालयाने काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांसाठी शाळेत वाचनालय सुरू केले, पण त्या वाचनालयाला विद्यार्थ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र सहा महिन्यांपूर्वी एका खासगी कंपनीच्या सहकार्याने याच शाळेत ई-लायब्ररी सुरू झाली. दहावीच्या विद्यार्थ्यांना किंडलचे वाटप केले. ई-लायब्ररीतील ‘लॅपटॉप’ आणि ‘किंडल’च्या आकर्षणापोटी विद्यार्थ्यांमध्ये हळूहळू वाचन संस्कृती रुजू लागली असून त्यातून आता शाळेतील वाचनालयास विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळू लागला आहे. या गॅझेट संस्कृतीने विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर पडली आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळील कुरुंद गावामध्ये आदर्श विद्यालय आहे. १९९४ मध्ये या शाळेची स्थापना झाली. या शाळेत पाचवी ते दहावीचे वर्ग भरतात. दहा शिक्षक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करतात. साडेचारशेहून अधिक विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत असून ते खालिंगे, दळेपाडा, वाफाडे, हरिपाडा, देवळी, घागसपाडा, आतकोली, वाहुली आणि आलाब अशा आसपासच्या आदिवासी पाडय़ांमध्ये राहतात. त्यापैकी अनेक पाडे शाळेपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे पालक साक्षर नसल्यामुळे त्यांच्यात शिक्षणाविषयी फारशी जनजागृती नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये शाळेत जाण्याविषयी उदासीनता असते. मात्र वाचन संस्कृतीमुळे शाळेमध्ये नियमित येण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक विष्णू विशे यांनी दिली. काही वर्षांपूर्वी शाळेमध्ये वाचनालय सुरू करण्यात आले असून तिथे अनेक प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. पुस्तके वाचनाकडे विद्यार्थी कानाडोळा करीत असल्यामुळे वाचनालयास फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु ई-लायब्ररीमुळे विद्यार्थ्यां वाचनाकडे वळाले असून शाळेच्या वाचनालयास प्रतिसाद मिळत आहे.

लायब्ररी उपक्रम..

सहा महिन्यांपूर्वी आदर्श विद्यालयात ई-लायब्ररी सुरू असून दहावीच्या ७० विद्यार्थ्यांना किंडलचे वाटप केले आहे. ‘अ‍ॅमेझॉन केअर’ आणि ‘इंडियन वुमन चिल्ड्रेन फाऊंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून शाळेत हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाद्वारे शाळेला प्रोजेक्टर, लॅपटॉप, किंडल देण्यात आले आहेत. याशिवाय, इंटरनेट सेवा आणि वाचनालयासाठी एक हजार पुस्तके देण्यात आली आहेत. शाळेमध्ये मिनी सायन्स सेंटर आणि आयटीसी लॅब आहे. त्यामुळे ई-लायब्ररीमध्ये लॅपटॉपवर तसेच किंडलवर पुस्तके वाचण्याच्या आकर्षणापोटी विद्यार्थी वाचनाकडे वळले आहेत, असे ‘अ‍ॅमेझॉन’चे अधिकारी अभिजीत बोरकर आणि ‘इंडियन वुमन चिल्ड्रन फाऊंडेशन’चे अध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी दिली.

शाळेचा काव्यकट्टा..

आर्दश विद्यालयात मुख्याध्यापकांनी सहा वर्षांपूर्वी शाळेत काव्य कट्टा सुरू झाला. प्रत्येक आठवडय़ातील दर शुक्रवारी शाळेत काव्य कट्टा होतो. यामध्ये अनेक विद्यार्थी स्वलिखित कवितांचे सादरीकरण करतात. विशेष म्हणजे, या कवितांचा संग्रह शाळेकडून तयार केला आहे.