News Flash

ओढ मातीची : साद घालते गावाकडची माती!

नोकरीनिमित्त लंडनमध्ये स्थायिक झालेले विरारचे वझे दाम्पत्य वसईची आणि मराठी संस्कृती टिकवून आहेत.

श्वेता पागार-साळुंके shwetamol1978@gmail.com

नोकरीनिमित्त लंडनमध्ये स्थायिक झालेले विरारचे वझे दाम्पत्य वसईची आणि मराठी संस्कृती टिकवून आहेत. जेव्हा वसईत येणं शक्य नसतं तेव्हा मराठमोळे सण ते लंडनमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरे करत असतात. आता तर वसईची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नसल्याने पुन्हा वसईला परतण्याचा निर्णय घेतला आहे.

बोळींजच्या वझे आळीमध्ये प्रतिकूल परिस्थितीत लहानाचे मोठे झालेल्या विवेक वझेंनी ‘दी लीला’मधून हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. त्यांनी भारतात अनेक वर्षे नोकरी केली. २००४ मध्ये त्यांनी लंडनच्या ग्रेंजमध्ये नोकरी स्वीकारली. त्यासाठी लागणारी रक्कम उभी करण्यासाठीही त्यांच्या कुटुंबीयांनी फार कष्ट केले.

विवेक आणि त्यांचे दोन्ही भाऊ  यांच्यात फार सख्य आहे. विवेक लंडनला गेले, तेव्हा त्यांच्याकडे मोबाइल नव्हते. महिन्यातून एकदाच हे तिघेही फोनवर एकमेकांशी बोलत. आपल्या कुटुंबापासून दूर राहणे फारच जड गेले. तिथली पहिली दीड वर्षे अतिशय संघर्षपूर्ण होती. मदत करणारे, आधार देणारे कुणीच नव्हते. पण मुळातच जिद्दी असणाऱ्या विवेकने सगळे नीट निभावून नेले.

तिथे राहताना सुरुवातीला त्यांना जो त्रास झाला, जी खाण्यापिण्याची आबाळ  झाली, ती त्यांच्या मनावर कोरली गेली आहे. त्यामुळे आता वसईतून तिथे गेलेले विद्यार्थी किंवा नव्याने नोकरीला लागलेले तरुण त्यांना भेटले की त्यांच्या राहण्याची सोय ते करून  देतात. विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणे आणि वेळप्रसंगी स्वखर्चाने त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करणे अशी धडपड करून ते आपल्या वसईच्या मातीचे ऋण फेडण्याचे प्रयत्न करतात.

अशा या माणूसवेडय़ा माणसाला नवाळ्यातल्या विनिताच्या रूपाने अगदी पूरक अशी अर्धागी मिळाली. विनितालाही माणसांची प्रचंड आवड. दुसऱ्यांना मदत करण्यात ती अगदी विवेकच्या तोडीस तोड आहे. लग्नानंतर वर्षभराने लंडनला गेलेली विनिता तिथे रिटेल्समध्ये नोकरी करते.

तिथे तीनेक वर्षे ते भाडय़ाच्या घरात राहिले. एकाच घरात भिन्नधर्मीय लोक भाडय़ाने राहत. स्वयंपाकघर सामाईक असल्याने आपली स्वयंपाकाची वेळ येईपर्यंत वाट पाहावी लागे. विनिता सांगते, ‘कधी कधी असे व्हायचे की आपला सण आहे, नैवेद्य बनवायचा आहे आणि दुसऱ्याच्या चुलीवर मांसाहारी अन्न शिजत आहे. मग बऱ्याचदा उपाशीच झोपलो आहे. अशा वेळी वाटायचे, आता आपल्या वसईत आपल्या माणसांत असतो तर.’

अशा अनेक तडजोडींनंतर २०१६मध्ये त्यांनी बेक्सली हीथ इथे स्वत:चा बंगला घेतला. आता त्यांना सगळे सणवार, नैवेद्य, पूजा आपल्या वसईतल्या प्रथांप्रमाणे पार पाडता येतात.

विवेक-विनिता सगळ्याच वसईकरांप्रमाणे पारंपरिक पदार्थाचे भोक्ते आहेत. मासे, अळूवडी, नारळीपाक, मेथीची आमटी, पुरणाची वांगी असे खाद्यपदार्थ त्यांना आवडतात. पण तिथे लंडनला हे सगळे कसे मिळणार? तिथले मासेच मुळात वेगळे असतात. त्यांना इथल्या माशांची चव कशी येईल? केळीच्या पानांतली पानगी तर दोघांच्या जिवाभावाची. पण जिथे केळीची पानेच मिळत नाहीत, तिथे पानगी बनवणे तर दुरापास्तच. दोघांनाही अशा वेळी, त्या त्या ऋतूत इथे वसईत असावेसे वाटते.

लंडनमध्ये व्हेमली येथे गुजराती वस्ती आहे. प्लमस्टीडला नेपाळी व पंजाबी वस्ती आहे. तिथे भारतातून आलेल्या भाज्या उपलब्ध होतात. त्यासाठी जवळजवळ तासाभराचा प्रवास करून विनिता फक्त भाज्या खरेदी करायला जाते आणि भारतीय भाज्या बनवते.

आपल्याकडे सगळेच सणवार विशिष्ट हवामान आणि ऋतुचक्राप्रमाणे साजरे होतात. इथल्या तिथीप्रमाणे विवेक-विनिता तिथे सगळे सणवार आवर्जून साजरे करतात. पण तिथे तेव्हा वेगळेच ऋतू सुरू असतात. असाच एक अनुभव विनिताने सांगितला. ‘आपला वर्षांतला पहिला सण गुढीपाडवा. आपल्याकडे वर्षांरंभाला वातावरण उत्साहजनक असते. झाडांना नवी पालवी फुटलेली असते. पण तिथे आम्ही गुढी उभारतो, तेव्हा वातावरण कुंद असते, झाडांची पाने पूर्णपणे गळून गेलेली असतात.’

दिवाळी मात्र तिथे स्थायिक झालेले वसईकर एकत्र येऊन उत्साहात साजरी करतात. दिवाळीच्या दरम्यानच तिथे हॅलोविन हा सण येतो. त्यामुळे तिथले सगळे लोक फटाके वाजवण्यात आणि आतषबाजीचे कार्यक्रम पाहण्यात गुंग झालेले असतात. त्याच वाहत्या गंगेत आपले वसईकरही दिवाळीच्या फटाक्यांची हौस भागवून घेतात.

नवरात्रीत ते घटस्थापना करत नाहीत, पण एखाद्या शनिवारी सांस्कृतिक कार्यक्रम करतात, रासगरबा खेळतात. रविवारी मिरवणूक काढतात आणि आपली उत्सवप्रियता पूर्ण करतात.

लंडनला बरीच महाराष्ट्र मंडळे आहेत. तसेच वेलिंग मराठी मित्रमंडळ नावाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहे. त्यांचे सदस्य मराठी कलाकारांना बोलावून कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि भंडारा आयोजित करतात आणि आपली संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न करतात.

आपल्या वसईची खास ओळख असणाऱ्या काही गोष्टी आहेत. ‘वसई कला-क्रीडा महोत्सवा’ला वसईच्या जनमानसात मानाचे स्थान आहे. त्यातल्या निकोप स्पर्धात्मक वातावरणाची विनिताला डिसेंबर महिन्यात हमखास आठवण होते. तिच्या माहेरच्या गावात म्हणजे नवाळ्यातून आषाढी-कार्तिकी एकादशीला निघणाऱ्या दिंडीची आठवणही तिला येते. निर्मळच्या जत्रेची सर तिथल्या ‘फेस्ट’ला येत नाही, असे दोघांचेही म्हणणे आहे. एकूणच, एवढी वर्षे तिथे स्थायिक असतानाही, वसईच्या मातीचे संस्कार या दोघांत अगदी आतवर मुरलेले आहेत.

आपल्याकडची लग्नसराई, मुंजीसारखे कार्यक्रमच काय तर विनिताचे डोहाळे जेवणही तिला या नोकरीमुळे अनुभवता आलेले नाही. कुटुंबापासून दूर असताना त्यांना नेहमी जाणवते की लंडनमध्ये शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सोयी कितीही चांगल्या असल्या तरीही आपल्या लोकांच्या मायेची ऊब तिथे राहून मिळत नाही. इथे त्यांच्या घरी एकत्र कुटुंबपद्धती टिकून आहे. त्यांच्या सहवासात राहण्यासाठी विवेक-विनिता वर्षभराच्या सुट्टय़ा साठवून आणि थोडी बिनपगारी रजा घेऊन, दर गणेशोत्सवाला आपल्या वसईतल्या घरटय़ात परत येतात. गणरायाचे आशीर्वाद आणि दोन महिन्यांत लाभलेले घरच्यांचे प्रेम त्यांना पुढच्या दहा महिन्यांच्या वाटचालीचे बळ देते. निवृत्तीनंतरचे जीवन भारतातच जगणार, असे ते ठामपणे सांगतात. त्यांच्या मनातील मातीची ओढ त्यांना नक्कीच आपल्या माणसांत परत घेऊन येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 3:34 am

Web Title: virar couple settled in london celebrate marathi festival zws 70
Next Stories
1 भाजीबाजारात तेजी कायम
2 ट्रान्सहार्बरचीही रखडपट्टी
3 दिव्यातील कचराभूमी अधिकृत करण्याच्या हालचाली
Just Now!
X