निवडणूक आयोगाची मोहीम फोल? *  विविध कार्यालयांतील जनजागृती फलकावर स्वाक्षऱ्यांची संख्या कमी
‘ना नशेने, ना नोटेने, नशीब बदलेल मताने’ असा संदेश देत मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता निर्भय होऊन मतदान करावे यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि कल्याण डोंबिवली महापालिकेने सुरू केलेल्या जागृती अभियानाला सुसंस्कृत म्हणविल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवलीकरांचा अत्यल्प असा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

महापालिकेच्या पुढाकाराने काही महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये यासंबंधीचे फलक बसविण्यात आले असून त्यावर स्वाक्षरी करून प्रतिसाद देणे अपेक्षित धरण्यात आले आहे. मात्र या फलकांवर आजमितीस अतिशय कमी स्वाक्षऱ्या दिसत असल्याने या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा रंगली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू केले आहेत. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महापालिका हद्दीतून पुरेशा प्रमाणात मतदान होत नाही, अशी तक्रार सातत्याने केली जात असते. महापालिका निवडणुकीचा इतिहास लक्षात घेतला तरी हे प्रमाण ५० टक्क्यांच्या आसपास असते. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी प्रचारामुळे देशभरातील बहुतांश मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी मोठय़ा प्रमाणावर वाढली होती. कल्याण-डोंबिवलीत मात्र नेमके उलट चित्र दिसत होते. १ नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली महापालिकेचे मतदान आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून विविध प्रकारचे संदेश देण्यासाटी फलक उभारणी करण्यात आली आहे.
या फलकांवर ‘ना नशेने, ना नोटेने, नशीब बदलेल मताने’, ‘निर्भय होऊन मतदान करू, पालिकेचा आम्ही सन्मान करू’, असे संदेश फलकावर झळकवून त्याद्वारे स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु नागरिक केवळ हे फलक वाचण्यात धन्यता मानतात. त्यावर स्वाक्षरी करण्याची मात्र कोणी तसदी घेत नाही, असा अनुभव निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आलेल्या कार्यकर्त्यांनीही या फलकांवर फारशा स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत, असे निरीक्षण एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नोंदवले.

‘शहरभर जनजागृती करावी’
निवडणूक आयोगाने सुरू केलेली ही मोहीम महापालिका कार्यालयांपुरती मर्यादित न ठेवता शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत कशी नेता येईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा शहरातील काही जाणकार नागरिकांनी व्यक्त केली. अशी काही मोहीम सुरू आहे याचा अनेकांना थांगपत्ताही नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा, रेल्वे स्थानके या परिसरातही असे संदेश पोहचले पाहिजेत. त्यासाठी तिथेही अशी फलकबाजी करण्यात यावी, असे या नागरिकांनी सांगितले.