ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका २०१७ मध्ये होणार असून त्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावत करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने पुढील काळात घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांसाठी ही मतदार यादी वापरली जाणार आहे. त्यामुळे ठाण्यातील मुंब्रा, कळवा, ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि कल्याण ग्रामीण या भागातील नागरिकांना महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कार्यालयांमध्ये मतदार नोंदणी करता येऊ शकणार आहे. १ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांनाही मतदार म्हणून यात नोंदणी करता येणार आहे.
दोन वर्षांनंतर येऊ घातलेल्या ठाणे महापालिका निवडणूक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी मतमोजणी मोहीम राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवली जात आहे. त्या माध्यमातून नव्याने १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या तरुणांना मतनोंदणी करता येणार आहे. तर नाव, जन्मतारीख, पत्त्यातील दुरुस्ती, दुबार, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याची सुविधासुद्धा या माध्यमातून करून दिली जाणार आहे. ८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे. मतदारांना आपली नावे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही पाहता येणार असल्याचे निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मतदान नोंदणीसाठी कार्यालये..
* कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मतदारांना सवरेदय मॉल, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर, कल्याण पूर्व, ०२५१-२९७००५८
* ओवळा माजिवडा प्रभाग समिती, तिसरा मजला, यशस्वीनगर, बाळकुम- ठाणे (प.), ०२२-२५४०६१८२
* कोपरी पाचपाखाडी, वागळे इस्टेट, २८ आयटीआय, ठाणे (प.), ०२२-२५३३११६४
* ठाणे, सेतू कार्यालय, पहिला मजला, तहसीलदार कार्यालय, ठाणे (प.) ०२२-२५४२३७६
* मुंब्रा-कळवा, जुने कळवा प्रभाग कार्यालय, दुसरा मजला, तरण तलाव, मनीषानगर, कळवा- ठाणे (प.) ०२२-२५४४८५०१