News Flash

‘प्रभाग’फेरी : पाणी, पार्किंगची बोंब

या परिसरात रस्ते, पाणी, वीज, शौचालये आदी प्राथमिक सोयींचीही बोंब आहे.

‘प्रभाग’फेरी : पाणी, पार्किंगची बोंब

वागळे इस्टेट प्रभाग समिती

एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक वसाहतीचा परिसर म्हणून वागळे परिसर ओळखला जायचा; परंतु काळाच्या ओघात ही ओळख आता संपुष्टात आली आहे. बेकायदा बांधकामे आणि चाळींच्या वाढलेल्या विळख्यात हा परिसर सापडल्याने आता या परिसराची ओळख बेकायदा बांधकामाचे आगार अशी होऊ लागली आहे. रहेजा, काजूवाडी, लुईसवाडी, कशीश पार्क अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी अधिकृत गृहसंकुले वगळली तर उर्वरित भागात मात्र बेकायदा बांधकामेच दिसून येतात. पाणी, पार्किंग, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी आणि फेरीवाले अशा समस्यांनी हा परिसर ग्रासलेला आहे.

मुळात या भागाचा नियोजनबद्ध विकास न झाल्याने या समस्या सुटण्याऐवजी त्यात आणखीनच भर पडली आहे. या भागात मुख्यत्वेकरून मध्यमवर्गीय राहतात. मराठी तसेच उत्तर भारतीय समाजही या भागात मोठय़ा प्रमाणात वास्तव्यास आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार ज्ञानेश्वर नगर, रामचंद्रनगर, काजूवाडी हा परिसर प्रभाग क्रमांक १३ मध्ये तर किसन नगर नं.१, पडवळ नगर, शिवशक्तीनगर हा भाग प्रभाग क्रमांक १८ मध्ये येतो. तसेच आनंदनगर, गांधीनगर, रघुनाथनगर, मनोरुग्णालय हा भाग प्रभाग क्रमांक १९ मध्ये येतो. वागळेतील बंद पडलेल्या कारखान्याच्या जागेवर मोठमोठे बिझनेस सेंटर उभे राहू लागले असून त्यामुळे या भागाची आता वेगळी ओळख निर्माण होऊ लागली आहे.

त्यामुळे येथील नागरिकांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. असे असले तरी या बिझनेस सेंटरसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची येथे वानवा दिसून येते.

या भागातील अरुंद रस्त्यामुळे भविष्यात या भागातील वाहतूक कोंडीची डोकेदुखी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

वागळे प्रभाग समिती हद्दीतील लोकसंख्या लाखांच्या घरात असून किसननगर, आनंदनगर, गांधीनगर, रघुनाथ नगर भागातील बेकायदा इमारती व चाळीमध्ये मध्यमवर्गीय समाज राहतो. मराठी नागरिकांसह, परप्रांतीय समाजाचा आकडा या भागात लक्षणीय आहे.

या परिसरात रस्ते, पाणी, वीज, शौचालये आदी प्राथमिक सोयींचीही बोंब आहे. या भागातील बेकायदा इमारती आता मोडकळीस आल्या असून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठा आहे.

गेल्या काही वर्षांपासून या भागात क्लस्टर योजना राबविण्याची मागणी सातत्याने पुढे येत आहे. मात्र, ही योजना प्रत्यक्षात राबविली जात नसल्याने नागरिकांना आजही जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये हा संपूर्ण परिसर येतो. या भागातून वर्षोनुवर्षे शिवसेनेचे नगरसेवक निवडून येत असल्याने हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

पदपथांवर अतिक्रमण

ज्ञानेश्वर नगर, रामचंद्रनगर, काजूवाडी, किसन नगर नं.१, पडवळ नगर, शिवशक्तीनगर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांच्या बाहेरील जागा प्रत्येक दुकानदाराने स्वत: फायद्यासाठी अडवलेली दिसते. त्यातून ती जागा फेरीवाल्यांना भाडय़ाने दिली जाते. त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे शक्य होत नाही. त्यातच रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना हातगाडय़ा आणि फेरीवाले बसत असल्याने नागरिकांना त्यामधून वाट काढावी लागते.

फेरीवाल्यांची समस्या.

ज्ञानेश्वरनगर, रामचंद्रनगर, काजूवाडी, हजुरी एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येच्या भागात अधिकृत मंडई नसल्याने येथे रस्त्यांवर फेरीवाल्यांचा बाजार भरतो. अतिशय दाटीवाटीने रस्त्यावरच हा बाजार भरत असल्याने या भागातील वाहतूक कोंडीची समस्या आता नित्याची झाली आहे. आधीच अरुंद रस्ते व पायवाटा यामधून गल्ल्यांतून वाट काढताना रहिवाशांचा जीव मेटाकुटीला येतो. मात्र फेरीवाले बिनदिक्कतपणे रस्ते अडवून या भागात बस्तान मांडतात.

समूह विकासाच्या प्रतीक्षेत

आनंद नगर, धर्मवीर नगर, गांधीनगर, ज्ञानेश्वरनगर, काजूवाडी हजुरीगाव, किसन नगर, पडवळ नगर, शिवशक्ती नगर आदी भागांमधील नागरिक क्लस्टर योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र ही योजना प्रत्यक्षात केव्हा होणार, असा सवाल रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

पाणी समस्या..

संपूर्ण किसननगर अनेक इमारतींमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. महिलांना तीन ते चार मजले चढून घरामध्ये पाणी वाहून न्यावे लागते तर काही नागरिक पाणी वाहण्याचा त्रास वाचविण्यासाठी मोटारीचा वापर करतात.

नव्या फेररचनेनुसार प्रभाग

प्रभाग क्रमांक – १३

आरक्षण – अ ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

ब ) सर्वसाधारण महिला

क) सर्वसाधारण महिला

ड ) सर्वसाधारण

लोकसंख्या – ५६ हजार ९२५

प्रभाग क्षेत्र – ज्ञानेश्वर  नगर, रामचंद्रनगर, काजूवाडी

प्रभाग क्रमांक – १८

आरक्षण – अ ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

ब ) सर्वसाधारण महिला

क) सर्वसाधारण महिला

ड ) सर्वसाधारण

लोकसंख्या – ५३ हजार ४१४

प्रभाग क्षेत्र – किसन नगर नं.१, पडवळ नगर, शिवशक्तीनगर

३) प्रभाग क्रमांक १९

आरक्षण – अ ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला

ब ) सर्वसाधारण महिला

क) सर्वसाधारण महिला

ड ) सर्वसाधारण

लोकसंख्या – ५२ हजार ३२३

प्रभाग क्षेत्र – आनंद नगर, गांधीनगर, रघुनाथ नगर, मनोरुग्णालय परिसर

पार्किंग प्लाझाची गरज..

केवळ वागळे परिसरच नव्हे तर संपूर्ण शहरात पार्किंगची समस्या दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. त्यासाठी महापलिकेने पार्किंगच्या प्रश्नला प्राधान्य द्यावे.

– प्रतीक महाडिक

पदपथ मोकळे करा..

हजुरी भागात पदपथांवर अतिक्रमण झालेय. मात्र त्यावर कारवाई होताना दिसून येत नाही. सर्वप्रथम महापालिकेने येथील पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करून द्यावेत.

– सलीम गावित

उद्यानांची गरज

किसननगरात  दाटीवाटी आहे.  येथे मोकळ्या जागेचा अभाव जाणवतो.  लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान हवे.

– नंदिनी अहिर

क्लस्टरचा प्रश्न सोडवा..

किसननगरात बेकायदा इमारती आहेत. त्यासाठी क्लस्टर योजना राबविण्याची गरज आहे. येत्या काळात क्लस्टरची अंमलबजावणी लवकरात लवकर केली पाहिजे.

– अक्षय गवळी

पार्किंगच्या विळख्यात.

कशिश पार्कबाहेरील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. तीन हात नाक्यापासून ते मॉडेला चेक नाक्याच्या डाव्या बाजूला मोठय़ा प्रमाणात वाहने पार्क केली जातात. त्यामध्ये अवजड ट्रक, कंटेनरचा समावेश असतो. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होत असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2017 2:37 am

Web Title: wagle estate ward committee
Next Stories
1 उल्हासनगर भाजपमध्ये सर्वपक्षीय उडय़ा?
2 ओमी भाजपमध्ये गेल्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसचा ‘हात’!
3 शिवसेनेचा ‘फेकूगिरी’चा कळस
Just Now!
X