भगवान मंडलिक

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष; वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, नागरिक हैराण

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर पलावा येथील चौकात होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात या पार्श्वभूमीवर या चौकात भुयारी पादचारी मार्ग उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. मात्र, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अजूनही याकडे लक्ष दिलेले नाही.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यंतरी भेट घेतली होती. त्या वेळी पलावा चौकातील परिस्थिती आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागणारा त्रास याचे सविस्तर विवेचन मुख्यमंत्र्यांपुढे करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा आणि कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते. हे निर्देश देऊन ११ महिने झाले तरी यासंबंधी कोणतेही पाऊल उचललेले नाही.   काही राजकीय आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे ही कामे करून घेणे अवघड होत आहे, असे दामले यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

उपाययोजनांचा अहवाल लवकरच

पलावा चौकात वाहतुकीत सुसूत्रता यावी. तेथील कोंडी टाळता येईल आणि अपघात होणार नाहीत यादृष्टीने काय करता येईल याकरिता कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, पोलीस, बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी पलावा चौक भागाची पाहणी केली. या पाहणीतून निघणाऱ्या निष्कर्षांचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे, असे ससाणे यांनी सांगितले. पलावा चौकात भविष्यात अपघात किंवा अन्य कोणतीही दुर्घटना घडू नये यादृष्टीने एक समग्र अहवाल तयार करून तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जिल्हा रस्ता सुरक्षितता समिती, शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, असे ससाणे यांनी स्पष्ट केले.