दिवा, डायघर, खिडकाळी भागांत कचऱ्याचे साम्राज्य

स्वच्छ भारत अभियानात ठाणे शहराला आघाडी मिळावी यासाठी महापालिकेमार्फत मोठय़ा घोषणांचा धडाका लावला जात असला तरी महापालिका क्षेत्राचा एक भाग असलेल्या दिव्यालगतच्या शीळ-डायघर, देसाई, खिडकाळी, अभयनगर, खर्डी, फडकेपाडा या एक लाखाहून अधिक वस्ती असलेल्या परिसरात मात्र जागोजागी कचरा, घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. या संपूर्ण क्षेत्रात महापालिकेची साधी कचराकुंडीही कुठे दिसत नाही. या ठिकाणी घंटागाडीतून येणारे कर्मचारी रहिवासी वस्त्यांमध्येच कचरा जाळत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

केंद्र सरकारने आखलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा सध्या सगळीकडे गाजावाजा सुरू असला तरी डायघर, शीळसारख्या वस्त्यांमध्ये या अभियानाचा लवलेशही नाही. शीळफाटा चौकात लागूनच असलेल्या डायघर गावात चार ते पाच हजारांच्या घरात लोकवस्ती आहे. या संपूर्ण वस्तीसाठी गावात एकही कचराकुंडी नसून आठवडय़ातून एकदाच घंटा गाडी येते, असे येथील रहिवाशांनी सांगितले. एखाद्या वेळेस घंटागाडी आली तरी येथून जमा केलेला कचरा नागरी संकुलानजीकच्या मोकळय़ा जागांवर टाकून जाळण्यात येतो. त्यामुळे हा भाग कायम कचऱ्याच्या धुराने वेढलेला दिसतो. ठाणे शहर प्लॉस्टिक मुक्त करीत असल्याचा दावा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल नेहमीच करतात. मात्र, डायघर आणि आसपासच्या परिसरात जागोजागी प्लॅस्टिक पिशव्याचे ढीग तसेच थर्माकॉलचा कचरा पसरल्याचे दिसून येते. या भागातील नाल्यांची सफाईदेखील वर्षांनुवर्षे झाली नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

यासंबंधी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घनकचरा विभागाचे हळदेकर यांना विचारा असे सांगितले. हळदेकर यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही ते उपलब्ध झाले नाहीत.

पालिकेला धडा नाहीच!

‘स्वच्छ भारत अभियाना’त गेल्या वर्षी ठाणे महापालिकेचा क्रमांक घसरला होता. त्यास डायघर, शीळ, दिवा आणि आसपासच्या परिसरातील अस्वच्छता कारणीभूत ठरल्याची चर्चा होती. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा या भागातील अवस्था यंदा दयनीय असल्याचे काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

‘स्वच्छ’ ठाण्याचे वास्तव

* डायघर आणि आसपासच्या गावांच्या परिसरात वेशीवरच सांडपाणी पसरल्याने येथील रस्ते चिखलमय झाले आहेत.

* देसाई पाडा येथील पाच पाडे खिडकाळी, शीळ, खार्डी, अभयनगर, कल्याणफाटा, फडकेपाडा या गावांमध्ये कचराकुंडीच नाही.