|| शलाका सरफरे

पाच दिवस ओला तर दोन दिवस सुका कचरा संकलनाचा प्रस्ताव; दहा हजारांहून अधिक सोसायटय़ांना कडोंमपा आयुक्तांचे आदेश

कल्याण-डोंबिवली परिसरांतील वाढत्या कचऱ्याची समस्या काही प्रमाणात दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आठवडय़ातून सलग पाच दिवस केवळ ओल्या कचऱ्याचे संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील रहिवाशांना ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणे अंगवळणी पडावे यासाठी आठवडय़ातून दोन दिवसच सुका कचरा गोळा केला जाणार आहे. उर्वरित दिवस ओला कचरा गोळा करून तो कचराभूमीवर आणला जाणार असून यामुळे कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण करणेही शक्य होईल, असा दावा महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी केला.

महापालिकेच्या नियोजनानुसार दहा हजारांहून अधिक गृहसंकुले, खासगी आणि व्यावसायिक आस्थापना तसेच शहरातील व्यापाऱ्यांना येत्या काळात अशा सूचना केल्या जाणार आहेत. कल्याण-डोंबिवली कचरा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आधारवाडी कचराभूमीवरील कचऱ्याचा भार कमी होईल, असा दावा आयुक्त बोडके यांनी केला. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कचराभूमीची क्षमता संपूनही गेल्या अनेक वर्षांपासून या भागात कचराफेक सुरू असून यामुळे येथील रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. उन्हाळा सुरु होताच आधारवाडी कचराभूमीवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला आग लागते आणि येथील जनजीवन विस्कळीत होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण परिसरातील जागरूक नागरिकांनी पुढाकार घेतला असून थेट कचरा विघटन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या निमित्ताने हा उपक्रम सुरू झाला असून मंगळवारी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी आधारवाडी येथील कचराभूमीला भेट देऊन या प्रकल्पाची पाहाणी केली. या वेळी त्यांच्यासोबत आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते.

एक डिसेंबरपासून अंमलबजावणी

आधारवाडी कचराभूमीवर कचरा विलगीकरणाचे मोठे प्रकल्प आखण्यासाठी शहरातून ओला आणि सुक्या कचऱ्याचे योग्य प्रमाणात वर्गीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या १ डिसेंबरपासून नागरिकांनी पाच दिवस ओला कचरा महापालिकांच्या गाडय़ांमध्ये टाकावा, तर दोन दिवस सुका कचरा संकलित केला जाईल, असा निर्णय घेण्यात येत आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. कल्याण-डोंबिवली शहरात सद्य:स्थितीत एकूण दहा प्रभागांमधून दररोज ६५० मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. त्यापैकी ५० टक्के कचरा हा ओला असून या कचऱ्याचे विलगीकरण योग्य प्रकारे व्हावे असा प्रयत्न आहे.

कल्याण-डोंबिवली शहरांतील नागरिकांकडून कचरा विकेंद्रीकरणाकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्यामुळे कचराभूमीवरील कामाचा ताण वाढतो. हे थांबवण्यासाठी नागरिकांकडून केवळ पाच दिवसच ओला कचरा, तर गुरुवार आणि रविवार असे दोन दिवस सुका कचरा संकलित करण्यात येणार आहे. याची कडक अंमलबजाणी करण्यात येणार असून नागरिकांनी महापालिकेस सहकार्य केल्यास कल्याणकरांचा कचऱ्याचा त्रास कमी होऊ  शकेल.

गोविंद बोडके, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महापालिका नागरिकांना सुका आणि ओला कचरा वेगळा करण्याची सवय लागण्यासाठी महापालिकेने निर्णय घेतला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी व्यापक जनजागृती करण्याचे काम जागरूक नागरिकांकडून करण्यात येणार आहे.    – श्रीनिवास घाणेकर, जागृत नागरिक मंच