वृक्षांवर घाला, पदपथही अडवले, कचरा मात्र एकत्रच गोळा

ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी ठाण्यात महापालिकेमार्फत जागोजागी उभारण्यात आलेल्या लहान कचरापेटय़ा (टेकबिन) पर्यावरण आणि रहदारीला अडथळा ठरू लागल्या आहेत. कचरापेटय़ा लावताना सुशोभीकरणासाठी लावलेल्या लहान झाडांची छाटणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी पेटय़ांनी पदपथ अडवल्यामुळे पादचाऱ्यांना अडथळे येत आहेत. त्यासाठीचे अ‍ॅप्लिकेशन चालत नसल्याच्या आणि कचराही एकत्रच गोळा होत असल्याच्याही तक्रारी येत आहेत. टेकबिन बिनकामाचे ठरत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

स्वच्छ भारत अभियानात सातत्याने मागे पडणाऱ्या ठाणे महापालिकेने यंदा या आघाडीवर वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनापासून महापालिकेने खासगी संस्थांच्या पुढाकाराने शहरात आधुनिक कचरापेटय़ा उभारण्याचे काम हाती घेतले. टेकबिन नावाच्या या कचरापेटय़ा थोडय़ा वेगळ्या असून यामध्ये नियमित कचरा टाकणाऱ्यांना सोन्याचे बक्षीसजिंकता येईल, अशी घोषणाही महापालिकेने केली आहे. पेटीत ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी दोन वेगळे कप्पे आहेत. मात्र समतानगर, वर्तकनगर येथे रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी दुतर्फा लावलेल्या वृक्षांचा काही भाग कचरापेटय़ांसाठी कापण्यात आला आहे. उपवन येथे पदपथ अडवून मध्यभागीच कचराकुंडय़ा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

टेकबिनचे स्वरूप

टेकबिनमध्ये कचरा टाकण्यासाठी चार भाग आहेत. ओला, सुका, घातक आणि प्लास्टिकचा कचरा टाकण्यासाठी चार कप्पे आहेत. योग्य कप्प्यात कचरा टाकणाऱ्या नागरिकास सोने तसेच इतर बक्षिसे मिळतील असे महापालिकतर्फे जाहीर करण्यात आले आहे. यासाठी टेकबिन नावाचे अ‍ॅप्लिकेशन मोबाइलमध्ये असणे आवश्यक आहे. टेकबिन कचराकुंडीवर असणाऱ्या यंत्रणेवर मोबाइलवरील टेकबिन अ‍ॅप्लिकेशनमध्ये नोंदवलेले स्वत:चे खाते स्कॅन केल्यानंतर वापरकर्त्यांने टाकलेल्या कचऱ्याची माहिती अ‍ॅप्लिकेशनद्वारे कळते. मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवर टेकबिन कचराकुंडय़ा कुठे आहेत हेदेखील समजते, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

अ‍ॅप्लिकेशन आणि कचराकुंडय़ा दोन्ही निरुपयोगी

प्ले स्टोअरवर टेकबिन हे अ‍ॅप्लिकेशन असले तरी ते सुरू होत नाही. अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर मोबाइल फोनच हँग होतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. कचरा वर्गीकरणासाठी तयार केलेल्या या कचरापेटीत कचरा मात्र एकाच ठिकाणी जमा होतो, अशी काही नागरिकांची तक्रार आहे. अनेक टेकबिनमध्ये विद्युतपुरवठाही नसून फक्त जाहिरातींसाठीच ते तयार करण्यात आले आहेत का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

टेकबिन नागरिकांसाठी उपयुक्तच आहेत. ते उभारताना काही भागांतील रोपटी तोडली असतील. टेकबिनविषयी आम्ही जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहोत. लवकरच विविध उपक्रमांद्वारे याविषयी मोठी जागरूकता मोहीम हाती घेण्यात येईल.

– मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण विभाग