भगवान मंडलिक, कल्याण

शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचे तळ सपाटीला गेले आहेत. ग्रामीण भागात पाणीटंचाई गंभीर आहे. पाणीसाठे जपून वापरण्यासाठी शासनाचे सर्व स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत नोव्हेंबरनंतर वाहता असलेल्या मोहने बंधाऱ्यातील पाणी पाऊस पडेपर्यंत म्हणजे जूनपर्यंत एकाच जागी थिजून असते. तोच मोहने बंधारा तळपत्या वैशाख वणव्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून दुथडी भरून वाहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहाड-आंबिवलीच्या दरम्यान मोहने बंधारा आहे. या ठिकाणाहून कल्याण-डोंबिवली महापालिका मागील २५ वर्षांहून अधिक काळ पिण्यासाठी पाणी उचलते. या बंधाऱ्यावर पाटबंधारे विभागाचे नियंत्रण आहे. या बंधाऱ्याच्या काठाला मोहने उदंचन केंद्र आहे. पालिका हद्दीला पाणीपुरवठा करण्यासाठी उदंचन केंद्रात सहा पंप आहेत. हे पंप चोवीस तास पाणी उचलण्याचे काम करतात. कर्जत भिवपुरीजवळील आंध्र धरणातून टाटा पॉवर येथे वीज तयार केल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी उल्हास नदीतून मोहने बंधाऱ्याच्या दिशेने वाहत येते. पाणी मोहने उदंचन केंद्राजवळून वाहून जाऊ नये म्हणून केंद्राजवळ पाच ते सहा फूट उंचीचा बंधारा घालण्यात आला आहे.  कल्याण-डोंबिवली पालिका मोहने उदंचन केंद्र येथून १४७ दशलक्ष लिटर पाणी दररोज उचलते. ही पाण्याची गरज मोहने बंधाऱ्यातील साठवण पाण्यातून भागविली जाते.

‘वाढीव पाणीपुरवठय़ाची मागणी नाही’

पालिकेने वाढीव पाणीपुरवठा करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे का, याविषयी पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांना संपर्क साधला असता अशा प्रकारे कोणतीही मागणी पालिकेकडून पाटबंधारे विभागाकडे केलेली नाही. आंध्र धरणातील पाण्यावर टाटा पॉवर येथे वीजनिर्मिती केल्यानंतर वापरलेले पाणी नदीत सोडले जाते. पाणीवापराचे प्रमाण अधिक असेल तर त्या प्रमाणात पाणी नदीत येते. त्यामुळे मोहने बंधाऱ्यावरून पाणी वाहत जात असावे, अशी शक्यता पाठक यांनी व्यक्त केली.

या प्रकारात नवीन असे काही नाही. निर्मितीप्रक्रियेसाठी किंवा नदीपात्रातून संस्थांकडून पाणी उचलण्याचे प्रमाण कमी झाले की अधिकचे पाणी वाहत पुढे येते. त्यामुळे मोहने येथील बंधाऱ्यावरून सध्या पाणी वाहत असावे.

– उमेशचंद्र पवार, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग