मनवेलपाडा, कारगिलनगर परिसरात दूषित पाण्याने नागरिक हैराण

गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या विरार पूर्वेच्या कारगिलनगर आणि मनवेलपाडा येथील रहिवाशांना आता पाणी मिळाले असले तरी या पाण्यात चक्क अळय़ा आढळून आल्या आहेत. महापालिकेकडून देण्यात आलेले हे पाणी दूषित असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

विरार पूर्वेच्या कारगिलनगर परिसरात शेकडो चाळी आहेत. यापैकी अध्र्याहून अधिक चाळींना नळजोडण्या मिळालेल्या नाहीत. ज्यांना नळजोडण्या मिळालेल्या आहेत, त्या पुरेशा नाहीत. त्यामुळे पाण्याअभावी येथील नागरिकांचे हाल होत आहे. सह्याद्रीनगर, गणेशनगर, मनवेलपाडा गाव या ठिकाणचे नागरिक टँकरच्या पाण्यावर जगत आहेत. त्यातच एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. महापालिकेकडून एक दिवसाआड जो पाणीपुरवठा होतो, तोही दूषित होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पाण्यात लहान लहान अळय़ा असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

कारगिलनगरमधील रहिवासी मंगेश सामटे यांनी बुधवारी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करून अळय़ा असलेल्या पाण्याचे नमुने सादर केले. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी या परिसराला भेट दिली. पाण्याच्या टाक्या स्वच्छ आहेत, परंतु गळतीमुळे गटारीचे पाणी शिरून किडे येत असावेत, असे त्यांनी सांगितले. या दूषित पाण्यामुळे नागरिक मात्र संतप्त झाले आहे. एकतर पाणी मिळत नाही आणि जे मिळत आहे ते पाणीही दूषित असल्याने आमच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे येथील महिलांनी सांगितले.

अनेक चाळींच्या इमारती झाल्या आणि लोकसंख्या वाढली, परंतु नळजोडण्या वाढल्या नाहीत. नवीन नळजोडण्या देण्याऐवजी त्याच नळातून इतर जोडणी देण्यात आली. त्यामुळे पाण्याचा दाब कमी झाला, असे रहिवासी सांगतात. जुन्या चाळींना नळाच्या जोडण्या आहेत. परंतु नंतर तयार झालेल्या नवीन चाळींना नळजोडण्या अजून मिळालेल्या नाहीत. त्यांना टँकरच्याच पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक चाळी या उंच भागात आहे. त्यामुळे पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. उन्हाळ्यात पाण्याची सर्वात जास्त मागणी असते. एकदिवसाआड पाणी येते. ते भरण्यासाठी नळावर तासनतास रांगा लावाव्या लागतात, तरीही पुरेसे पाणी मिळत नाही. आलेले पाणी भरून ठेवण्यासाठी आटापिटा करावा लागत असल्याचे दिसून येत आहे, असे येथील महिलांनी सांगितले.

या परिसरातील येणाऱ्या पाण्यात लहान अळ्या सापडल्या आहेत. दोन दिवसांपासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नेमकी काय समस्या आहे आणि कुठून पाणी दूषीत होत आहे, याचा शोध घेत आहेत. मोरेगाव तलावाजवळून जाणाऱ्या जलवाहिनीत गळती होऊन दूषीत पाणी शिरत असावेत आणि तेथूनच अळ्या येत असण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत ही समस्या दूर होण्याची आशा आहे.    – चिरायू चौधरी, सभापती, प्रभाग समिती ‘ब’