मुबलक पाणीसाठा असूनही वितरण त्रुटींमुळे पाणीटंचाई; रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात

ठाणे : ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत लांबलेला पाऊस आणि काठोकाठ भरलेली धरणे यामुळे यंदा ठाणे जिल्ह्य़ातील शहरांवर पाणीटंचाईचे संकट नाही असे दावे सातत्याने केले जात असले तरी घोडबंदरमधील अनेक मोठय़ा वसाहतींमधील रहिवाशांना ऐन दिवाळीत पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याचे चित्र आहे. वितरण व्यवस्थेतील दोषांमुळे ही समस्या सातत्याने निर्माण होत असल्याचे पालिका अभियंत्यांचे म्हणणे  आहे.

घोडबंदर भागातील विजय गार्डन, धर्माचा पाडा, ब्रह्मांड, माजिवडा, कासारवडवली यांसारख्या परिसरांतील वसाहतींमध्ये पाणीटंचाईमुळे रहिवासी त्रस्त आहेत. गेल्या वर्षी याच परिसरातील काही मोठय़ा नागरी वसाहतींमध्ये पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे येथील तांत्रिकी बिघाड दूर करण्यात महापालिका प्रशासनाला सातत्याने अपयश येत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ठाणे जिल्ह्य़ात सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणे काठोकाठ भरल्याने वर्षभराची पाण्याची सोय झाली आहे. असे असताना जुन्या ठाण्याच्या दुप्पट लोकवसाहत असलेल्या घोडबंदर भागात वारंवार टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. टोलेजंग इमारती आणि मोठी गृहसंकुले यासह विविध व्यावसायिक संकुले आणि मॉल्स घोडबंदर परिसरात उभी राहिली आहेत. त्यामुळे अधिक पाण्याची गरज असणाऱ्या या भागाला गेल्या काही दिवसांपासून अनियमित आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले आहे. दोन आठवडय़ांपासून घोडबंदर परिसरातील विजय गार्डन, धर्माचा पाडा, ब्रह्मांड, माजिवडा, कासारवडवली या भागांतील विविध मोठय़ा गृहसंकुलांमधील घरात कमी प्रमाणात पाणी येत असल्याची तक्रार या भागात राहणाऱ्या रहिवाशांकडून करण्यात आली आहे. महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांद्वारे गृहसंकुलाच्या पाणी टाक्यांमध्ये पुरेसे पाणी येत नसल्याचा दावा येथील रहिवाशांकडून करण्यात आला आहे.

टाक्यांची क्षमता जास्त

काही वर्षांपूर्वी घोडबंदर परिसरालाही बारवी धरणाद्वारे पाणीपुरवठा होत असे. त्या वेळी घोडबंदर येथील मोठय़ा क्षमतांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये बारवी धरणातून पाणी येत असे. आता बारवीऐवजी भातसा नदीपात्रातून महापालिकेला पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पूर्वीच्या टाक्यांची क्षमता अधिक मात्र पाण्याची पातळी कमी असल्याने या गृहसंकुलांना पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमधून पाण्याचा प्रवाहदेखील कमी होत आहे. त्यामुळे घोडबंदर येथील काही गृहसंकुलांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

घोडबंदर भागातील गृहसंकुलांना पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचा तांत्रिक बिघाड असल्याने त्यांना पाणीपुरवठा कमी प्रमाणात होतो.  पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचा तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला असून गृहसंकुलांना सुरळीत पाणीपुरवठा होत आहे.

– अर्जुन अहिरे, उपअभियंता, पाणीपुरवठा, ठाणे महापालिका