अवैध उपशामुळे पाणी पातळी घटल्याची शक्यता

पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये पाणीकपातीचा निर्णय जाहीर केला असताना हा पाणीपुरवठा ज्या उल्हास नदीवर अवलंबून आहे तिच्या पात्रात मात्र टँकर माफिया अर्निबध उपसा करत आहेत. गेल्या महिनाभरात उल्हास नदीची पाणी पातळी खालावली असताना बदलापूर चौपाटी परिसरातून वहाणाऱ्या पात्रातून रोज हजारो लिटरचा पाणीउपसा सुरू आहे.

सप्टेंबरपासून पाऊस न पडल्याने पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. पाटबंधारे विभागाने उल्हास नदीवरील पाणी उपशात २२ टक्के कपात करण्याचा निर्णय २२ ऑक्टोबरला जाहीर केला. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कल्याण डोंबिवली महापालिका, स्टेम प्राधिकरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या एकूण एक हजार १९२ दशलक्ष घनलिटर पाण्याची बचत होणार आहे. असे असताना बदलापुरातील चौपाटी समोर पाण्याचे टँकर थेट नदीपात्रात उतरवून पाणी उचलले जात आहे. दिवसाला शंभरहून अधिक टँकर येथून पाणी भरून नेतात, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. प्रतिटँकर १०-२० हजार लीटर पाणी नेण्यात येते. हे पाणी अडीच ते पाच हजारांना विकण्यात येते.

टँकर माफियांप्रमाणेच नदीच्या किनारी असलेली फार्म हाऊ स, उपाहारगृहे, रिसॉर्ट यांच्याकडूनही थेट नदीत वाहिन्या टाकून मोटारद्वारे पाणी उपसले जात आहे. लाखो लिटर पाण्याची राजरोस चोरी होत आहे.

चोरी रोखण्यासाठी यंत्रणाच नाही

पाण्यावर पाटबंधारे विभागाचे नियंत्रण असले, तरी पाणीचोरी किंवा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे कोणतीही यंत्रणा नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागातील अभियंत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. अवैध पाणी उपसा थांबावा यासाठी स्थानिक प्राधिकरणांनी पावले उचलायला हवीत, अशी अपेक्षाही या अधिकाऱ्याने व्यक्त केली.