26 October 2020

News Flash

जलकुंभ जलाविना!

या परिसराला टँकरने पाणीपुरवठा केला जात असून टँकर आला नाही, तर रहिवाशांचे पाण्याविना हाल होत आहेत.

कामणमधील जलकुंभात अद्याप पाणी आलेले नाही.

१० वर्षांपूर्वी बांधलेल्या टाकीमध्ये अद्याप पाण्याचा थेंबही नाही; कामणमध्ये भीषण पाणीटंचाई

वसई तालुक्यातील कामण भागातील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा योजनेंतर्गत १० वर्षांपूर्वी येथे जलकुंभ बांधण्यात आला, मात्र या जलकुंभात पाण्याचा एकही थेंब अद्याप पोहोचला नसून देखभालीअभावी हा जलकुंभही मोडकळीस आला आहे. या परिसराला टँकरने पाणीपुरवठा केला जात असून टँकर आला नाही, तर रहिवाशांचे पाण्याविना हाल होत आहेत.

वसई तालुक्याच्या पूर्व भागातील चंद्रपाडा, टोकरे, डोलीव, खार्डी, टिवरी, मालजीपाडा, बापाणे, जूचंद्र, चिंचोटी, कामण, देवदळ, कोल्ही, ससुनवघर इत्यादी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या कडक उन्हामुळे विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे त्यातील क्षारांचे प्रमाणही वाढले आहे, तर नैसर्गिक स्रोत असलेले झरे, तळी, तलाव आटली असून येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कामण गावात दहा वर्षांपूर्वी पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलकुंभ बांधण्यात आला होता. हा जलकुंभ बांधून पूर्ण झाला, मात्र या जलकुंभात अद्याप पाणी पोहोचले नाही. या जलकुंभाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तिची दुरवस्था झाली आहे. हा जलकुंभ सध्या मोडकळीस आला असून तो कधीही कोसळण्याची शक्यता आहे.

महापालिकेचे दुर्लक्ष

वसई पूर्वेकडे जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली होती. आपल्या हक्काचे पाणी मिळावे याकरिता ८ मार्च २०१७ मध्ये नगरसेविका प्रीती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली येथील नागरिकांनी पालिका मुख्यालय येथे आंदोलन छेडले होते. या वेळी पालिकेतर्फे त्यांना दोन महिन्यांमध्ये पाणी मिळणार, असे आश्वासन उपायुक्त अजीज शेख यांनी  दिले होते, परंतु पालिकेने त्यांच्या या मागणीला केराची टोपली दाखवत एक वर्ष पूर्ण झाले तरी पाणी मिळाले नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. येथे नदी, तलाव, विहिरी असे पाण्याचे स्रोत आहेत. त्यातील पाणी मार्च जानेवारीमध्ये आटायला सुरुवात होते. त्यामुळे जर पालिकेने या पाण्याच्या स्रोतांची योग्य देखभाल करून योग्य ती सोय केली तर आम्हाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नसल्याचे मत दिनेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.

आंदोलनाचा इशारा

कामण, चिंचोटी, कामण, देवदळ इत्यादी भागांत पालिकेतर्फे टँकर पुरवले जातात. मात्र तेही अनियमित असून तीन ते चार दिवसांतून एकदा हे टँकर येथे फिरकतात. त्यामुळे येथील नागरिकांना विकत टँकर मागवावा लागतो, तसेच टँकरचे पाणी दूषित असल्याने पिण्यासाठी पाणीही विकत मागवावे लागत आहे. त्यामुळे वेळोवेळी पालिकेतर्फे आश्वासन देऊन वारंवार या आश्वासनाला केराची टोपली पालिकेने दाखवली आहे. त्यामुळे जर अशीच परिस्थिती राहिली तर पुढील आठवडय़ात नगरसेविका प्रीती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयात धरणे आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

आदिवासींकडून दूषित पाण्याचा वापर

वसई पूर्वेतील काही भागांत राहत असलेले आदिवासी पाण्यासाठी नदीत खड्डे पाडून त्यातील दूषित पाण्याचा वापर करत आहेत. हे दूषित पाणी पिल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 3:44 am

Web Title: water scarcity water tank
Next Stories
1 हत्येचा बदला हत्येने
2 पापडखिंड धरणाबाबत नागरिकांकडून सूचना
3 स्वत:ची पाणीपुरवठा योजना उभारणारे गाव!
Just Now!
X