अंबरनाथ : ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या अंबरनाथ येथील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या केंद्रातून होणारा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्र आणि बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठा येत्या १५ जुलैपर्यंत वापरता यावा यासाठी काही प्रमाणात पाणीकपात करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या जानेवारी महिन्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येक पंधरा दिवसांत एकदा २४ तासांसाठी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता होती. मात्र काही कारणास्तव ही कपात लागू करण्यात आली नाही. मात्र अखेर शुक्रवारी ही पाणीकपात लागू केली जाणार आहे. अंबरनाथच्या जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचे काम या काळात केले जाणार आहे. त्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शनिवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात तीन ठिकाणी दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाने दिली आहे.

जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून तीन वाहिन्यांच्या माध्यमातून नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि पनवेल या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. येथून दररोज सुमारे ७४० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. शुक्रवारी पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.