कल्याण-डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात; जादा पैसे कमवण्यासाठी टँकरचालकांचा उद्योग
पालिकेकडून होणारा अपुरा पाणीपुरवठा, विहिरी आणि कूपनलिकांनी गाठलेला तळ यामुळे अनेक वस्त्या पाण्यासाठी आता टँकरवर अवलंबून आहेत. मात्र पालिकेची यंत्रणा टँकरने पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरली असल्याने खासगी टँकरमाफियांचे चांगलेच फावले आहे. या संधीचा जास्तीत जास्त लाभ धेण्यासाठी या माफियांनी चक्क एरवी रसायनांची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पाण्याची टंचाई सर्वत्रच भेडसावत असून टँकर मागविण्याशिवाय नागरिकांकडे अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही. कल्याण-डोंबिवलीत सध्या भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागात मोठय़ा प्रमाणात टँकरची मागणी आहे. महापालिकेकडे हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच टँकर आहेत. त्यामुळे मागणी केल्यावर आठवडाभरानंतर पाणी मिळते, अशी माहिती एका रहिवाशाने दिली. त्यामुळे खासगी टँकर मागविण्याशिवाय नागरिकांकडे दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. एका टँकरमध्ये सर्वसाधारणपणे दहा हजार लिटर पाणी असते. महापालिका प्रशासन एका टँकरमागे ३२० रुपये आकारते. मात्र खासगी टँकरसाठी रहिवाशांना १६०० ते २००० रुपये मोजावे लागतात. इतके पैसे मोजूनही ते पाणी शुद्ध असेल, याची खात्री नसते. टँकर व्यवस्थित धुऊन त्यात शुद्ध पाणी भरत असल्याचा दावा टँकरचालक करीत असले तरी प्रत्यक्षात वास्तव भयानक आहे.
पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन या वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्यासाठी सर्व विधिनिषेध बाजूला ठेवून रसायन तसेच गॅस वाहून नेणारे टँकर पाणीपुरवठय़ासाठी जुंपले आहेत. त्यातील काही टँकर गंजले असल्याचे सांगितले जाते. टँकरचालकांकडून वितरित होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणारी कोणतीही ठोस यंत्रणाच अस्तित्वात नाही. त्यामुळे या महाग पाण्यामुळे आरोग्याची समस्या उद्भवेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

अतिसार, पोटदुखीमध्ये वाढ
दूषित पाण्यामुळे सध्या कल्याण-डोंबिवलीत अतिसार, उलटय़ा आणि पोटदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. वाढत्या उष्णतेमुळेही तब्येतीवर विपरीत परिणाम होतो. नागरिकांनी या काळात पाणी उकळूनच प्यावे, असा सल्ला डॉ. अश्विनी बोऱ्हाडे यांनी दिला आहे.