पालिकेच्या जलवाहिन्यांतून बेकायदा इमारती, चाळींना पाणीपुरवठा

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील २७ गावांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईबाबत आरडाओरड सुरू असली तरी, प्रत्यक्षात या पाणीटंचाईला स्थानिकांकडून केली जाणारी पाणीचोरीच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात रातोरात उभ्या केल्या जाणाऱ्या बेकायदा इमारती व चाळींना पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक विकासक, भूमाफिया जेसीबीसारख्या यंत्रांच्या साह्य़ाने पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला जलवाहिन्या जोडत असल्याचे आढळून येत आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळेत हे प्रकार होत असल्याने पालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

२७ गावांना एमआयडीसीच्या जलवाहिन्यांवरून सुमारे ३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज केला जातो. दहा वर्षांपूर्वी २७ गावांची एकूण लोकसंख्या ८० हजारांपर्यंत होती. आता या गावांच्या हद्दीत मोठय़ा प्रमाणात बेकायदा चाळी, इमारतींची बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे या भागातील लोकसंख्या सुमारे अडीच ते तीन लाखांच्या घरात गेली आहे. या सगळ्या बेकायदा वसाहतींना पालिकेच्या जलवाहिन्यांवरून चोरून पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी पालिकेच्या जलवाहिनीवर ताण येऊन कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र आहे.

गावातील प्रत्येक जण अशा प्रकारची पाणीचोरी करीत असल्याने कोणीही रहिवासी या चोरीच्या जलवाहिन्यांविषयी पालिकेकडे तक्रार करीत नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना या चोरीच्या जलवाहिन्यांविषयी माहिती मिळाली तरी अधिकृतपणे या वाहिन्यांविषयी तक्रार येत नाही, तोपर्यंत अधिकारी या चोरीच्या जलवाहिन्यांवर कारवाई करण्याचे धाडस करीत नाहीत. दावडी, भाल, वसार भागांत सुरू असलेल्या वीटभट्टय़ांच्या कामासाठी पालिकेच्या जलवाहिन्यांवरून चोरून जलवाहिन्या घेतल्या जात आहेत. गेल्या आठवडय़ात देसलेपाडा येथील सिद्धिविनायक दर्शन सभागृह परिसरातील भोपर रस्त्यावर रात्रीच्या वेळेत रस्ता खोदून स्थानिकांनी पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून चोरून जलवाहिनी घेतली आहे. मात्र याबाबत कुणीही तक्रारी करण्यासाठी पुढे आलेले नाही.

२७ गावांमध्ये पाणीचोरीच्या वाहिन्या घेण्याचा प्रकार सुरू आहे. अशा वाहिन्या शोधून त्या तोडण्यात येत आहेत; पण त्यामुळे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे कारवाई करताना थोडे अडथळे येत आहेत. २७ गावांमधील पाणीचोरीच्या जलवाहिन्या शोधण्याची मोहीम सुरू आहे. या कारवाईवरून गावांमधील काही मंडळी भेटण्यासाठी आली होती. शोधमोहिमेतून जेवढी कारवाई करता येईल तेवढी सुरूच ठेवण्यात येणार आहे.

-राजीव पाठक, कार्यकारी अभियंता, कल्याण-डोंबिवली महापालिका