नगरपालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय
बदलापूरकरांसाठी स्वस्त आणि बारीकसारीक गोष्टींसाठी प्रसिद्ध असा आठवडा बाजार आता उठणार आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेने याबाबत निर्णय घेतला असून यापुढे बाजार बसू दिले जाणार नाहीत, अशी माहिती नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी सभागृहात दिली.
बदलापूर पूर्वेतील कात्रप, शिरगाव तसेच पश्चिमेकडील हेंद्रेपाडा, मांजर्ली, बेलवली अशा अनेक भागांत आठवडय़ातून एकदा बाजार भरत असतात. या आठवडा बाजारामुळे रस्ते अडवले जातात. वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. त्याचप्रमाणे या बाजार काळात पाकिटमारी आणि चोऱ्यांचे प्रमाणही वाढल्याचे पोलिसांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी सभागृहाला दिली. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेले पत्र व पोलिसांच्या अहवालानंतर हा बाजार बंदीचा निर्णय घेतल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले.
दरम्यान, गेल्या काही काळापासून या आठवडा बाजारांना बदलापूरकरांकडून मोठय़ा प्रमाणावर पसंती मिळत होती. बदलापूर शहरासह आसपासच्या गावांतूनही विक्रेते येत होते. आठवडय़ातून एकदा शॉपिंगचा आनंद बदलापूरकर या बाजाराच्या निमित्ताने घेत होते. मात्र यामुळे छोटे विक्रेते आणि उद्योग करणाऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

आठवडा बाजार म्हणजे कमी भांडवलात जास्त धंदा असे म्हटले जाते. कोणत्याही दुकानाशिवाय आम्ही यात धंदा करू शकतो. मात्र जर अशा प्रकारे बाजार बंद केले जात असतील तर आम्ही लघु उद्योग करणाऱ्यांनी काय करावे. आम्ही दुकाने थाटू शकत नाही, म्हणून बाजार ते बाजार विक्री करत असतो.
– प्रल्हाद थाटे, विक्रेते.