तरुणांमध्ये सध्या वेस्टर्न म्युझिकची क्रेझ हळूहळू वाढत असली तरी भारतीय संगीत आजही तरुणांच्या मनामनात भिनते आहे. गाण्यांची जादू तरुणाईवर सर्वाधिक असल्याचे चित्र दिसते. नॅशनल स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टचे विद्यार्थ्यांच्या इंडियन सागा बॅण्ड हल्लीच्या तरुणांची आवड लक्षता घेऊन गाणी सादर करणार आहेत. विविआना मॉल व्यवस्थापनातर्फे ठाणेकरांच्या वीकेन्डची रंगत वाढविण्यासाठी बॅण्डचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री ९ या वेळेत विविआना मॉल, ठाणे (प.) येथे हा कार्यक्रम होणार आहे.

’कधी : सायंकाळी ६.३० ते रात्री ९.

’कुठे : विविआना मॉल, ठाणे (प.)

 

किशन व्हर्सेस कन्हैया

एका सामान्य माणसाचे देवाबद्दलच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर आधारित ‘किशन व्हर्सेस् कन्हैया’ या हिंदी नाटकाचा प्रयोग रविवारी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. ओ माय गॉड हा हिंदी सिनेमा याच नाटकावर आधारित आहे. हिंदी सिनेसृष्टीतील अष्टपैलू कलाकार म्हणून ख्याती असलेले परेश रावल हे या नाटकामध्ये मुख्य भूमिका सादर करणार आहेत.

’कधी– रविवार, १ नोव्हेंबर, वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

’कुठे– काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे(प.)

 

पं. हृदयनाथ, डॉ.सलील कुलकर्णी यांच्या गाण्यांची मैफल

ॠतुरंग या संस्थेच्या वतीने ‘मैत्र जिवांचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर आणि अभिजात रचनांचा वारसा चालविणारे तरुण संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी या कलावंतांना ऐकण्याची संधी ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमामध्ये १९५५पासून २०१५पर्यंतच्या निवडक स्वररचना, कविता याविषयी दिलखुलास गप्पांच्या सोबतीने लोकप्रिय गाणी, जुन्या आठवणींची एक वेगळी मैफल शनिवारी रात्री गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे.

’कधी– शनिवार, ३१ ऑक्टोबर. वेळ : रात्री ८.३० वाजता

’कुठे– गडकरी रंगायतन, ठाणे(प.)

 

मकरंद अनासपुरे यांची मुलाखत..

मकरंद अनासपुरे हे नाव ऐकताच डोळ्यांसमोर येतो तो एक सिनेकलाकार. कधी हसवणारा, तर कधी रडवणारा. मकरंद हा एक असा कलाकार ज्यांनी सिनेमाच्या माध्यामातून शेतकऱ्यांची व्यथा तर मांडलीच, परंतु खऱ्या आयुष्यातही शेतकऱ्यांसाठी ते देवदूत बनून मदत करतात. त्यांच्या अशाच विविध पैलूंचे दर्शन ठाणेकरांना घडविण्यासाठी येथील घंटाळी मित्र मंडळातर्फेअनासपुरे यांची मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. रविवार, १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सहयोग मंदिर, घंटाळी पथ, ठाणे(प.) येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नाम फाऊंडेशनला देणगी देण्याची विनंती संस्थेतर्फे करण्यात आली आहे. संपर्क-९८६९११४७९०

’कधी– रविवार, १ नोव्हेंबर, वेळ : सायंकाळी ६ वाजता.

’कुठे– तिसरा मजला सहयोग मंदिर, घंटाळी पथ, ठाणे(प.)

 

इंद्रधनू प्रदर्शन

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीसाठीच्या खरेदीला काही प्रमाणात सुरुवातही झाली आहे. ठाण्यातील घोडबंदरजवळील आर मॉलमध्ये दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. दिवाळीसाठी लागणारे प्रमुख साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी या ‘इंद्रधनू’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पणत्या, रांगोळ्या, तोरणे, स्टीकर रांगोळी, लायटिंग, इमिटेशन ज्वेलरी आदी वस्तू उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन येत्या शनिवारी घोडबंदर येथील आर मॉलमध्ये सकाळी अकरापासून सुरू राहणार आहे.

’कधी– शनिवार, ३१ ऑक्टोबर, वेळ : सकाळी ११ वाजता

’कुठे– आर मॉल घोडबंदर रोड, ठाणे(प.)

 

रविवारी ‘रागरंग’ मैफल

व्हर्टीकल नोटस् या संस्थेच्या वतीने रविवार १ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़संकुलातील लघु सभागृहात (मिनी थिएटर) संध्याकाळी ४ ते ७ यावेळेत  ‘रागरंग’ ही शास्त्रीय संगीताची विशेष मैफल आयोजित करण्यात आली आहे. या मैफलीत बालश्री पुरस्कारासाठी नामांकनप्राप्त युवा कलाकार अद्वैत काशीकर याचे बासरीवादन आणि अर्चना कान्हेरे यांचे शास्त्रीय सादर होईल. अभय जोशी (तबला) आणि अनंत जोशी (हर्मोनिअम) त्यांना साथ करणार आहेत.

 

दागिन्यांची रास

महिला वर्गाला दागिन्यांचे कायमच आकर्षण असते. त्यांची ही हौस पुरविण्यासाठी ठाण्यातील ठाकुरवाडी नेहमीच सज्ज असते. सोने, चांदी, मोती अशा पारंपरिक धातूंबरोबरच प्लॅटिनम, अमेरिकन डायमंड, ऑनिक्स अशा इतर प्रकारांतही दागिने मिळतात. सोन्या-चांदीच्या किमती कितीही चढय़ा असल्या, तरी दागदागिन्यांची हौस अजिबात कमी होत नाही. पारंपरिक भारतीय दागिन्यांमध्ये जयपूर पद्धतीच्या दागिन्यांना खूप महत्त्व आहे. कुंदन मीनाकाम हे जयपुरी संस्कृतीच्या दागिन्यांचे वैशिष्टय़. सध्या लाल-हिरव्या-निळ्या कुंदनांनी सजलेल्या दागिन्यांचे प्रदर्शन ठाण्यातील गोखले रोडवरील ठाकुरवाडी येथे भरविण्यात आले आहे.

’कुठे– ठाकुरवाडी, पानेरीसाडीच्या समोर, ठाणे(प.)

’कधी– दररोज दुपारी १२ ते रात्री ९

 

मायक्रोवेव्हचे मॅजिक

मायक्रोवेव्ह हे उपकरण केवळ अन्न गरम करण्यासाठी वापरले जाते असा ज्या महिलांचा समज आहे त्यांच्यासाठी खास ‘मायक्रोवेव्ह मॅजिक’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरम मॉलतर्फे अविरतपणे सुरू असलेल्या वुमन्स ऑन वेन्स्डे या उपक्रमाअंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये माक्रोवेव्हमध्ये बनविल्या जाणऱ्या विविध चविष्ट पदार्थाची मेजवानी शिकता येणार आहे. बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत कोरम मॉलमध्ये ही कार्यशाळा होणार आहे.

’कधी– बुधवार, ४ नोव्हेंबर, वेळ : दुपारी ४ ते रात्री ८

’कुठे- कोरम मॉल, मंगल पांडे रोड, कॅडबरी जंक्शनजवळ, ठाणे(प.)

 

जहांगीर सबावालांची चित्रे 

चित्रकार जहांगीर सबावालांची काही अखेरची चित्रे, जुनी छायचित्रे, पुस्तके, पोर्टफोलिओ आणि स्केचबुक्स इत्यादी वस्तूंचा ठेवा त्यांच्या पत्नी शिरीन सबावाला यांनी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयास दिला आहे. याचे सादरीकरण प्रसन्न मंगळूरकर ‘अनपॅकिंग द स्टुडिओ : सेलिब्रेटिंग द जहांगीर सबावाला बीक्वेस्ट’ हे प्रदर्शनाद्वारे करणार आहेत. जहांगीर सबावाला यांच्या वस्तूंच्या संगतीने स्टुडिओ, अकॅडमी आणि गॅलरी इत्यादींचे जहांगीर सबावालांच्या कारकिर्दीतील विशेष स्थान या प्रदर्शनाद्वारे लोकांसमोर येईल.

’जहांगीर निकोलसन कला दालन, दुसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची विस्तारीत इमारत, काळा घोडा.

’सोमवार, २ नोव्हेंबर, सायंकाळी ६ वाजता.

 

आज ‘सूर संध्या’

डॉ. आर. सी. हंसोटी आणि कला हंसोटी इंस्ट्रमेंटर म्युझिक ट्रस्टतर्फे ‘सूर संध्या’ संगीत मैफलीमध्ये ठाण्याचे कलावंत सरोदवादक विवेक जोशी यांचे एकल सरोदवादन आणि अमृता लोखंडे यांचे सतारवादन ऐकायला मिळणार आहे. तसेच नीतेश मोरे (ड्रम), रबाब सिंग (तबला), शलाका देशपांडे (व्हायोलिन) आणि हिमांशू गिंडे (बासरी) या कलवतांच्या फ्यूजन संगीताची मैफल ऐकण्याची संधी संगीतप्रेमींना मिळणार आहे. कार्यक्रमाला सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. संपर्क – ८४४६०५५५६९.

’दादर माटुंगा कल्चरल सेंटर, यशवंत नाटय़मंदिर शेजारी, जे. के. सावंत मार्ग, बॉम्बे ग्लास वर्क्‍स समोर, माटुंगा पश्चिम रेल्वे

’शुक्रवार, ३० ऑक्टोबर. सायंकाळी ६.३० वाजता.

 

डिव्हाइनतर्फे ‘दिल ढुंढता है’

व्यावसायिक मूल्य असलेली आशयगर्भ गीते लिहिण्यात हातखंडा असलेले आनंद बक्षी आणि अकल्पित रुपके व प्रतिमांतून तरल रचना करणारे गुलजार यांच्या गीतांवर आधारित ‘दिल ढुंढता है’ हा कार्यक्रम पनवेलमध्ये होत आहे. हिंदी चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ घडवणाऱ्या गीतकारांच्या प्रतिभेचा वेध घेण्यासाठी पनवेलमधील ‘दी डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेड’तर्फे ‘शायरों की कलमसे’ हा उपक्रम सध्या सुरू आहे. या अंतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमात आलोक काटदरे, विद्या निषाद, सोनाली कर्णिक, समीर विजयकुमार, किरण शेंबेकर व जयंत टिळक गाणी सादर करणार आहेत. लोकप्रिय निवेदक संदीप कोकीळ प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन जयंत टिळक यांचे आहे. संपर्क- ८०८२० १५३०५.

 

शेखर सेन यांचा गौरव आणि गायन-वादनाची मैफल

कुमार गंधर्व फाऊण्डेशनतर्फे दरवर्षी एका ज्येष्ठ संगीत कलावंताला ‘कुमार गंधर्व सन्मान’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा हा मान ज्येष्ठ गायक-नट आणि तुलसीदास, सूरदास, कबीर, विवेकानंद यांच्यावरील संगीतमय एकपात्री प्रयोग सादर करणारे शेखर सेन यांना दिला जाणार आहे. अभिनेता रघुवीर यादव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी कुमार गंधर्व यांचे शिष्य परमानंद  यांचे गायन आणि मुक्ता रास्ते यांचे एकल तबलावादन ऐकण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी खुला आहे. संपर्क – ९८९२४५१७१४.

’हॉल ऑफ कल्चर, नेहरू सेंटर, वरळी.

’रविवार, १ नोव्हेंबर, सायंकाळी ५.३० वाजता.

 

‘फेईन ऑफ जक्स्टापोझ’

साध्या भौमितिक रचनांचा वापर करून राखाडी रंगाच्या पाश्र्वभूमीवर विशिष्ट परिमाण आणि खोली प्रदान करणारी चित्रं चित्रकार सतीश गुडेकर यांनी साकारली आहेत. प्रस्तुत प्रदर्शनातील चित्रमालिका जीवन, निसर्ग आणि अद्भुत चमत्कार यांचा मागोवा घेणारी असून विविध बिंदू, वर्तुळं, चौकोन यांचा वापर केला आहे. या चित्रांतून छाया-प्रकाश, रंग छटा यांचा तोल साधण्याचा प्रयत्नही कलावंताने केला आहे. हार्ड बॉक्स बोर्डवर मिक्स मीडियममध्ये बहुतांशी चित्रे आहेत.

’आर्टिस्ट सेंटर कला दालन, अ‍ॅडोर हाऊस, के. दुभाष मार्ग, काळा घोडा.

’१ नोव्हेंबपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७.

 

‘सर्च विदिन’

माहितीच्या विस्फोटात पुस्तकांचं महत्त्व अधोरेखित करताना पुन्हा एकदा शांतपणे विचार करायची गरज आहे असे चित्रकर्ती शिल्पा पाटोळे यांनी प्रस्तुत प्रदर्शनांतील चित्रांमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आणि ज्ञान यामधील फरक सांगतानाच पुस्तकांबद्दल वाटणारं प्रेम, त्यांच्याशी संलग्न भावना जाग्या करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या चित्रांतून केला आहे.

’जहांगीर कला दालन, काळा घोडा.

’३ ते ९ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७.

 

‘चेसिंग द टाइम’

काळ कुणासाठी कधीच थांबत नसतो, वेळ सतत पुढे सरकत असते आणि घोडा थांबला की त्याचं महत्त्व संपत असं म्हटलं जातं. म्हणून याच संकल्पनेवर माणसाच्या आयुष्यात वेळेचं महत्त्व अधोरेखित करणारी चित्रं चित्रकर्ती मिठू बिस्वास यांनी आपल्या प्रदर्शनात मांडली आहेत. वेळेचं महत्त्व दर्शविताना प्रतीक म्हणून त्यांनी घोडय़ाचा वापर केला आहे. काळ आणि घोडा सतत धावत असतात. घोडा थांबला की त्याचं महत्त्व संपतं तसंच माणूस कार्यरत असेपर्यंत त्याच्या आयुष्याला अर्थ असतो. भूत, वर्तमान, भविष्य याचं भान ठेवलेला माणूसच यशस्वी होतो हेही सांगण्याचा प्रयत्न या चित्रांतून दिसतो.

’कमलनयन बजाज कला दालन, बजाज भवन, नरिमन पॉइण्ट

’२ ते ७ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७