22 November 2019

News Flash

येऊरमध्ये रानडुकराची शिकार

शिकारी फरारी; वन विभागाच्या कारवाईत तीन बंदुका जप्त

शिकारी फरारी; वन विभागाच्या कारवाईत तीन बंदुका जप्त

ठाणे : ठाणे येथील येऊरमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पार्टीसाठी हरणाची शिकार करण्यात आल्याच्या वृत्तामुळे शहरात एकच खळबळ उडाली. मात्र, उद्यान विभागाच्या प्राथमिक तपासादरम्यान हरणाची नव्हे तर रानडुकराची शिकार करण्यात आल्याचे उघड झाले. रानडुकराची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याचे नाव तपासात समोर आले असून तो फरारी झाला आहे. त्याच्या घरामधून शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या तीन बंदुका उद्यान विभागाने जप्त केल्या आहेत.

ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या चेना परिसरात हरणाच्या मांसाची विक्री केली जात असल्याची माहिती उद्यान विभागाला मिळाली होती. त्यासाठी उद्यानातील हरणांची शिकार केली जात असून त्यासाठी शिकाऱ्यांची टोळी कार्यरत असल्याचीही माहिती मिळाली होती. त्याची खातरजमा करण्यासाठी येऊर वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी चेना परिसरात सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईसाठी त्यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटची मदत घेतली होती. चेना परिसरातील एका घरामध्ये पथकाने छापा टाकून तपासणी केली. त्यावेळेस घरातील फ्रीजमध्ये पथकाला मांस आढळून आले. सुरुवातीला हे हरणाचे मांस असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. दरम्यान, उद्यान विभागाने केलेल्या प्राथमिक तपासामध्ये हे मांस रानडुकराचे असल्याचे समोर आले आहे.

शिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

चेना परिसरात राहणाऱ्या योगेश जाधव याच्या घरात छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईआधीच तो घरातून पसार झाला. त्याच्या घरातून शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन एअरगन, एक ठासणीची बंदूक जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी योगेशविरोधात वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून उद्यान विभागासह पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या घरातून जप्त केलेल्या एअरगन आणि बंदुकीचा वापर यापूर्वी शिकारीसाठी केला आहे का, याचा तपास उद्यान विभाग करत आहे.

चेना भागातील एका घरात हरणाची शिकार करून त्याचे मांस ठेवले असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे या घरात छापा टाकून केलेल्या कारवाईत रानडुकराचे २ किलो मांस सापडले आहे. हे मांस हैदराबादमधील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद यांच्या मार्गदर्शनानुसार या गुन्ह्य़ाचा तपास सुरू आहे.

– राजेंद्र पवार, येऊर वनपरिक्षेत्र अधिकारी

First Published on June 19, 2019 4:15 am

Web Title: wild boars hunting in yeoor forest
Just Now!
X